31.5.07

थोडा सा आसमान..

या, या मॅडम.. काय हवंय आपल्याला? म्हणजे कसला चष्मा हवाय? आम्ही बघा सगळ्या प्रकारचे चष्मे विकतो.. ज्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे!
चष्म्याबाहेरच जग कसं पाहिजे? हसरं, खेळकर की गंभीर? का खुसखुशीत विनोदी?

प्रत्येक क्षण टिपायची धडपड करणारं की प्रत्येकाचे अनुभव इकडून तिकडून सारखेच म्हणून आपलं वेगळेपण सर्वांआधी छापायची धडपड करणारं?
आजकाल ब्लॉग लिहायला लागल्यापासून जो लिहायचा मोड ऑन केलाय, त्यातून बाहेरचं दाखवणारा की त्यातच गुंतवणारा असा चष्मा? काही दिसलं की लिही यावर..
फुगंव शब्दांचे फुगे, आणि कर त्यावर तार्किक विश्लेषण.. शब्दांच्या छटांची भाषांतरे.. आणि त्यामागच्या भावनांच्या गुंत्यांचीही?
प्रत्येक व्यक्तीगणिक वेगळं भाषांतर, वेगळे अर्थ.. आणि या कॅलिडोस्कोपमधून पहाताना जे लिहायचं होतं ते कुठतरी हरवूनच जातंय असं काहीसं?
नक्की काय?
त्या त्या क्षणी ते ते लिहावं वाटणं म्हणजे नक्की काय?
त्या क्षणांची उत्स्फूर्त अशी प्रतिक्रिया की छापखान्याची डेड्लाइन?
स्वसमाधानाची शेखी मिरवायला, सर्जनशीलतेचा डांगोरा पिटायला की प्रतिक्रियांच्या झूली मिरवूनही अलिप्त राहायच्या भासात मश्गूल रहायला?
मॅडम, तुम्हाला त्या वक्त्याची गोष्ट माहितीये का?
अतिशय उत्तम वक्ता, प्रभावी, पण त्याचा एकच प्रॉब्लेम होता.. कुठ्लाही श्रोता नसताना तो खूप छान बोलायचा. ज्याक्षणी कुणीतरी ऍकायला लागायचं त्याक्षणी त्याची बोलती बंद. तो स्वतःच स्वतःचा श्रोता कधी झालाच नाही असं करता करता.. तुम्ही वाचता का हो तुमचं लिहिलेलं एक वाचक म्हणून? का त्यासाठी वेगळा चष्मा देऊ? तटस्थ वाचकाचा?
काय म्हणता, आजकाल तुमच्या पोस्ट्मध्ये प्रश्नांचे गुंते वाढले आहेत?
अहो, असले तर असले..
आता असलेले प्रश्न टाकून जाणार कुठे? कदाचित फक्त लिहून सुटणार नाहीत, पण लिहिल्याचं समाधान तरी..
समाधान!!
आरून फिरून गाडी परत समाधानाच्या शोधात..
का समोरचा समाधानाचा स्टॉप डोळ्याआड करताय? तो दिसावा असा चष्मा देऊ?
दूरवर पाहिलं की शांत करत जाणार्‍या समुद्रासारखं शांतवणारं सुख आणि त्याच्या जोडीला समाधान असं एकदम दिसू शकणारा चष्मा पाहिजे म्हणताय.. हं..
आपले आभाळ मोजावे आपणच
घेऊ नयेत कुणाचीही तटस्थ निरीक्षणे
सांदीफटीतून जर विशिष्ट ओळख नसलेले काही
हाताला लागले तर ते आपले आभाळच असते!

आपले आभाळ जोखावे आपणच
कुण्या दुसर्‍याने त्यात उड्डाणे भरण्याअगोदरच..
हात वर केल्यावर जे हाताला लागत नाही
ते ही असू शकते आपले आभाळच..

आपले आभाळ निरखावे आपणच..
कुण्या दुसर्‍याने त्यात सूर्यास्त चितारण्यापूर्वी
आपल्या आभाळात आपल्या नकळत
खूपदा होत असतात सूर्योदय, उल्कापात.. ग्रहणे

आपले आभाळ कमवावे आपणच
घेऊ नये कुणाचा ढगही उसना
असे उसने उसने ढग, ग्रह, तारे हे सारे मिळूनसुध्दा
दरवेळेला आभाळ बनतेच असे नाही..

आपले आभाळ समजून घ्यावे आपणच
मजेत बघावेत सटासट पडणारे तारे..
त्या आदिम सीनियर आभाळाखाली
आपले ज्युनियर आभाळ तोलत
पटापटा आपले बेसिक क्लियर करून घ्यावे
दोन्ही एकरूप होईपर्यंत!

आपल्या आभाळाच्या शोधात
आपला जन्म..
कुणालाच नकळत विरून गेलेल्या ढगासारखा
निघून जाईल कदाचित..
पण निदान आपल्याच आभाळात जाईल!
संदीपच्या त्या आभाळासाठीचा चष्मा मीही शोधतोय... सापड्ला की नक्की कळवेन!

30.5.07

रूबरू रोशनी है..

सेनापती बापट रोडवरून तुम्ही रिक्षातून जात असता, सिग्नल पडतो. अवघ्या दोन मिनिटांचा सिग्नल संपता संपत नाही लवकर, चिडचिड होते. आणि त्यात अचानक रिक्षाच्या एका बाजूने एखादा मळका हात 'ताई, काहीतरी द्या की वो..' असं म्हणून तोंड वेंगाडत उभा. त्या क्षणी काय प्रतिक्रिया असते? उदार मनाने त्याला भीक घालावी अशी की झटकून सरळ पुढं जावं अशी? भीक देऊन आपली जबाबदारी संपते असं वाटण्याची की न देता उगीच हुरहुरत रहाण्याची? हे सगळं आता अचानक लिहायचं कारण म्हणजे या रविवारी पुण्यात ( २७ मे) ड्रीमइंडिया- २०२० या संस्थेने बाल-सुधार अभियानात Anti Child-Begging Campaign ची कल्पना मांडली.

गरीब झोपडपट्टीतील मुलांना शिकवावं अशा हेतूनं मुंबईत काही आयटी वाल्यांनी सुरू केलेली ही संस्था आज पुणे, हैद्राबाद, बेंगलोर, चेन्नई आणि दिल्ली या शहरात फोफावली आहे. पुण्यात जेव्हा हा ग्रुप चालू करायचं ठरलं तेव्हा फक्त ई-मेल या माध्यमातून लोकांशी संपर्क साधला गेला,आणि त्यातून एकत्र आलेल्या मूठभर लोकांनी कसलाही अनुभव नसताना सुरू केलेले हे प्रयोग आता रजिस्टर्ड संस्था म्हणून नोंदले गेले आहेत. 'आपले घर' सारख्या अनाथाश्रमासाठी मदत करता करता 'मानव्य' सारख्या HIV ग्रस्त मुलांसाठी मदत सुरू झाली. इथवरच न थांबता हडपसरमधल्या झोपड्पट्टीत 'मस्ती की पाठशाला' सारखा उपक्रम राबवला जात आहे. 'आमच्या पोरांना कशापायी शिकवायचं? त्यापरीस त्यानला बूट्-पालीश कराया हावं..' ही पालकांची मानसिकता बदलवत 'असू दे, काम करून शिकतंय तर असूदे..' इथपर्यंतचा प्रवास लिहिताना एका ओळीत बसला तरी प्रत्यक्षात मात्र चिकाटीची कसोटी पाहणारा होता. त्यात आयटी पब्लिक म्हणजे कुणी आज इथे तर उद्या ऑनसाईट्ला, आज डेड्लाईन उद्या प्रोजेक्ट रिलिज अशा असंख्य अड्चणीतून व्हर्च्युअली ग्रुप ही संकल्पना राबवली गेली आहे.

या झोपडपट्टीतल्या मुलांना शिकवताना त्यांचा भीक मागण्याचा व्यवसाय आणि त्यामागचं दुष्ट्चक्र कळायला लागलं. मिळणारे पैसे खाण्यावर खर्च होण्यापेक्षा व्यसनात संपतात आणि न संपणार्‍या व्यसनांसाठी परत भीक्-चोर्‍या असं चक्र सुरू होत जातं. यानंतरच Anti Child-Begging Campaign ची कल्पना मांडली गेली. भीक मागणार्‍या मुलांना भीक देऊन कदाचित या चक्राला प्रोत्साहन देण्यापेक्षा खरंच त्यांना शिकायला आणि यातून बाहेर पडण्यासाठी मदत करता येऊ शकेल, असं वाटून रविवारी एम. जी. रोड्वर स्टॉल लावण्यात आला होता.

आयटीवाले म्हणजे सदैव आपल्याच नादात, त्यांना फक्त त्यांचं लाईफ सोडून काहीही माहित नसतं अशा कायम होणार्‍या तक्रारीनंतर त्याच आयटीचा उपयोग करून अवघ्या ३ लोकांनी सुरू केलेल्या या संस्थेत आज फक्त पुण्यातच साठापेक्षा जास्त सदस्य आहेत. 'जगी घाण अन चिखलच सारा' असं म्हणत सार्‍या सिस्टीमला दोष देणं हे तर आपण करू शकतोच पण, आपल्या परीने यात काहीतरी सुधारणा करायचा पर्याय अजूनही संपला नाही आहे. संस्थेचं घोषवाक्य आहे-- 'Together we can , together we should!'
एक प्रयत्न आपणही करायला काय हरकत आहे?

ता. क. 'मानव्य' बद्द्ल लिहिताना एड्सग्रस्त असा उल्लेख केला होता, चूक सुधारली आहे.