15.6.10

विहीर

टवका उडालेली स्वप्नं सावरताना विहीर दिसते अचानकच
थंड कठडा
उतरत गेलेल्या पायर्‍या
आत डोकावून पाहिलं तर काळं हिरवं पाणी पोटात साठवून बसलीये ही
सूर मारला की तोंडावर फटकावणारी
आणि तसंच तरंगत राहिलं की दिसतं वरचं निळंभोर आभाळ
गोलाकार कठड्याला बांधून ठेवलेलं
स्वप्नं सांधत नाहीत कदाचित
विहीर फक्त नजरेला शांतवते... तेवढाच दिलासा.
************************
माणसाच्या शारीरिक अस्तित्वाशी करकचून बांधता येतात का आठवणी?
स्पर्श
श्वासाची लय
कधीतरी रात्री दचकून उठल्यावर थोपटणार्‍या हातांची उब
त्याच्याही पलीकडे जाऊन आठवणींचे लपंडाव
अर्ध्या कच्च्या आठवणींचे नुसतेच ठोकळे
कुठे रिकामी महिरप आणि सतत ठिबकत राहिलेली वेदनेची जाणीव.
परत परत आठवांनी भरलेलं मन कोरडं कुठे होतं?
*********************
विसर्जनाचा विरघळून टाकणारा कल्लोळ आणि भावनांना तासताना
संपत जाणारी मी
कॅलिडोस्कोपातून दिसणारं तुकड्यातुकड्यांचं चित्र मी जमेल तशा
आठवणींनी जोडतेय तरीही अर्धवटच
अनुभवलेली प्रत्येक जाणीव आठवणीतच जमा होते हे सांगावं लागतं मलाच
परत परत
माझ्या अस्तित्वाचा भ्रम का त्याच्या नसण्याचा मी मांडलेला भ्रम?
********************
काळजाच्या नजरेने गोळा करता येतो
डहुळणार्‍या पाण्यातला चंद्र
पण तरीही आपल्याला मांडता येतात त्याच्या नसण्याच्या
गणितांची उत्तरं?
विहीरीच्या कठड्याशी उभारलं की त्याच्या नसण्याचे ठसे पुसले जातात
तो सापडतोच असं नाही, पण मी मला नव्याने दिसते हे काय कमी आहे?
*********************