19.8.07

कभी ना बीते चमकीले दिन..

The Happiest Man मध्ये डॅनी के आपल्या आईला विचारतो, 'हे इतके श्रीमंत लोक आपल्या घरी पुन्हा पुन्हा का येतात गं? ' त्यावर त्याची आई म्हणते, 'त्यांच्या आयुष्यातला खूप चांगला भाग ते इथेच ठेवून गेले आहेत ना, तो परत जगायला!'
पहिल्यांदा जेव्हा वाचलं तेव्हा हे कळंलं असं वाटलेलं उगीच. खरंतर असं असेल अशी किंचितही जाणीव नसलेले ते दिवस. एकाच छापाचे दिवस असू शकतात हेच मुळी कळायचं होतं तेव्हा. किंबहुना 'लख्ख उजळलेले दिवस' ही संकल्पना जन्मायची होती माझ्यापुरती.
एखादा मठ्ठ रटाळ दिवस उगवावा, कुठल्यातरी जुन्या वाईट आठवणींच सावट घेऊन आल्यासारखा. त्यात धबधबा पाऊस कोसळतोय म्हणजे डिप्रेसिंग मूड्ला अगदी निमंत्रणंच. हुरहुरणारी कातरवेळ अजूनच गडद होत जाणारी. अशात एकदम कुठलीतरी मैत्रिण खळाळणार्‍या उत्साहात घरी येते किंवा अचानक एखादा मित्र भेट्तो रस्त्यावर.
जादूची कांडी फिरवावी तशी आनंदाची वलयं ओसंडून जातात.
तेव्हा त्या वलयात आजूबाजूची माणसं, पाऊस असल्या सगळ्या गोष्टी हरवतात. कुठल्याकुठल्या आपल्या आपल्या वाटणार्‍या गूळपीठीय गोष्टींना वाचा फुटते आणि इतके दिवस हे कुठं लपून राहिलेलं असं वाटायला लागतं. मगाचच्या त्या 'मूड' ची पुरती दाणादाण उड्ते. काहीही ग्रेट न करताही उगाचच काहीतरी अचिव्ह केल्याची जाणीव होते आणि फक्त संध्याकाळच नाही तर अख्खा दिवस लख्ख उजळून जातो मग.( आता यासाठी थँक्स म्हणण्याइतका कोरडेपणा नाही करता येत मला, आणि सुदैवानं माझं बरंचसं मित्रमंडळ हे वाचतही नाही त्यामुळं त्याची फारशी गरजही नाहीये! :P )
कधीकधी जो आयुष्यातला चांगला भाग ज्यांच्या हाती सोपवून मी विसरले आहे, ते असे अधूनमधून त्याची जाणीव करून देतात. त्याला नॉस्टॅल्जिया म्हणा किंवा काहीही. पण 'आपण भारीच आहे रे!' या ब्रीदवाक्याची परत गर्जना करत पुढच्या कित्येक एकसुरी दिवसांची धार कमी होते हे निश्चित!