9.12.07

रेघोट्याच सार्‍या...


लिहायला काहीच सुचत नाहिये, किंबहुना या जगाशी संपर्कच तुटल्यासारखा झालाय. त्यामुळे सध्या फक्त हे चित्र. अर्थातच कुणी यावर कमेंट दिली तर आवडेल निश्चितच!

19.8.07

कभी ना बीते चमकीले दिन..

The Happiest Man मध्ये डॅनी के आपल्या आईला विचारतो, 'हे इतके श्रीमंत लोक आपल्या घरी पुन्हा पुन्हा का येतात गं? ' त्यावर त्याची आई म्हणते, 'त्यांच्या आयुष्यातला खूप चांगला भाग ते इथेच ठेवून गेले आहेत ना, तो परत जगायला!'
पहिल्यांदा जेव्हा वाचलं तेव्हा हे कळंलं असं वाटलेलं उगीच. खरंतर असं असेल अशी किंचितही जाणीव नसलेले ते दिवस. एकाच छापाचे दिवस असू शकतात हेच मुळी कळायचं होतं तेव्हा. किंबहुना 'लख्ख उजळलेले दिवस' ही संकल्पना जन्मायची होती माझ्यापुरती.
एखादा मठ्ठ रटाळ दिवस उगवावा, कुठल्यातरी जुन्या वाईट आठवणींच सावट घेऊन आल्यासारखा. त्यात धबधबा पाऊस कोसळतोय म्हणजे डिप्रेसिंग मूड्ला अगदी निमंत्रणंच. हुरहुरणारी कातरवेळ अजूनच गडद होत जाणारी. अशात एकदम कुठलीतरी मैत्रिण खळाळणार्‍या उत्साहात घरी येते किंवा अचानक एखादा मित्र भेट्तो रस्त्यावर.
जादूची कांडी फिरवावी तशी आनंदाची वलयं ओसंडून जातात.
तेव्हा त्या वलयात आजूबाजूची माणसं, पाऊस असल्या सगळ्या गोष्टी हरवतात. कुठल्याकुठल्या आपल्या आपल्या वाटणार्‍या गूळपीठीय गोष्टींना वाचा फुटते आणि इतके दिवस हे कुठं लपून राहिलेलं असं वाटायला लागतं. मगाचच्या त्या 'मूड' ची पुरती दाणादाण उड्ते. काहीही ग्रेट न करताही उगाचच काहीतरी अचिव्ह केल्याची जाणीव होते आणि फक्त संध्याकाळच नाही तर अख्खा दिवस लख्ख उजळून जातो मग.( आता यासाठी थँक्स म्हणण्याइतका कोरडेपणा नाही करता येत मला, आणि सुदैवानं माझं बरंचसं मित्रमंडळ हे वाचतही नाही त्यामुळं त्याची फारशी गरजही नाहीये! :P )
कधीकधी जो आयुष्यातला चांगला भाग ज्यांच्या हाती सोपवून मी विसरले आहे, ते असे अधूनमधून त्याची जाणीव करून देतात. त्याला नॉस्टॅल्जिया म्हणा किंवा काहीही. पण 'आपण भारीच आहे रे!' या ब्रीदवाक्याची परत गर्जना करत पुढच्या कित्येक एकसुरी दिवसांची धार कमी होते हे निश्चित!

30.6.07

बोलाचा भात!

"ताल्पिट.. क्या होता है ये?" माझ्या अमराठी रूममेट्ने शक्य तितका बरोबर उच्चार करत विचारलं.
" ओह, थालीपीठ ( ठ चा अगदी ठसठशीत उच्चार करत) अरे बहोत सही होता है.. मेरी मॉम बनाती है ना ( माझ्या जवळपास सगळ्या पदार्थांची सांगायची सुरवात माझी आई/मावशी/ काकू/ आत्या/ आज्जी यानी बनवलेल्या त्या पदार्थांच्या आठवणीत रमलेल्या मनाला जागं करून होते. ) तो पहले हम सारे आटे (??) आय मीन सारे फ्लोअर लेके उसमे ओनियन ( प्याज गं ,माझी बयो) डालते है और उसका गोला बनाके तवे पे थापते मतलब लगाते है.. ( हिंदीचा आणि पर्यायाने थालीपीठाच्या रेसिपीचा यथास्थित चुराडा करूनही माझ्या रूममेटच्या चेहर्‍यावरचं प्रश्नचिन्ह काय संपलं नाही.)

आता एखादीनं काय केलं असतं की एकतर गेला बाजार आपली हिंदी सुधारून चांगली रेसिपी दिली असती नाहीतर कमीतकमी थालीपीठ करून खायला घातलं असतं. पण नाही, आम्ही समस्या दिसली किंवा नसली तरी शोधून काढून त्याचे विश्लेषण करणार. तिच्या (समस्येच्या हो) मूळावर घाव घालायच्या प्रयत्नात आम्ही. तर आमचे असं का होतं? दाक्षिणात्यांची इडली-डोसा-सांबार , पंजाब्यांचे सरसों का साग आणि मक्के की रोटी इतकं जगप्रसिध्द आणि जगभर मिळत असताना आमच्या मराठी पदार्थांना काहीच 'ब्रँड व्हॅल्यू' असू नये म्हणजे काय ते! प्रश्न अगदी मराठी अस्मिता- आम्ही मराठी सदैव मागंमागंच का, अशा धोकादायक वळणांवर जाताना पाहून मी विचारांचे उधळलेले घोडे आवरले आणि पाककृतीचा शोध सुरू केला.
अस्सल मराठीतून गुगलून झाल्यावरही हव्या तशा पाककृती सापडेनात ( थालीपीठ हा एक महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ आहे यावर विकी ने थालीपीठाला खाऊन टाकलं होतं!) मराठीतून फूड ब्लॉग (अर्थात अन्न्-जालनिशी??) खूपच कमी आहेत असंही दिसलं. इंग्लिश्मधले सुरेख छायाचित्रांनी नटलेले ब्लॉग्ज पाहून खर्‍या अर्थानं रसना रसरसली. पण असे सुरेख पदार्थ माझ्या हाती आपलं सारं अस्तित्व विसरून तिसर्‍याच कशाच्या रूपात अवतीर्ण होतात हे काही नवीन नाहिये! आताही थालीपीठांनी तवा सोडायचं नाकारलं, आपलं तोंड काळं करत तव्याचा बट्ट्याबोळ करवला जेणेकरून माझ्या रूममेट्ला कुठुन ही अवदसा आठवली याचा पुनःप्रत्यय दिला.(काम आणि कंटाळा याच्या अभूतपूर्व संगमामुळे मी मागच्या पोस्टवरती अजून प्रतिक्रिया टाकतेच आहे, अशा भयानक उत्साही मला असलं काही सुचलं याचं समाधान वाटावं की केलेल्या पराक्रमामुळे थक्क व्हावं असा पेच पडला असणार तिला!! :D ) आणि वरती माझी प्रतिक्रिया होतीच, अरे मेरी मॉम ये बहोत अच्छा बनाती है.. ( खरंतर 'मी बनवलेला हा पदार्थ आतापर्यंत मी खाल्लेला सर्वोत्कृष्ट पदार्थ आहे' आणि 'माझे केस हे सगळ्यात सुंदर केस आहेत' असं म्हणणारी मुलगी/तरूणी/स्त्री/ वृद्धा मलातरी आढळलेली नाहीये, त्यामुळे मी ही काहीही केलं आणि कसंही झालं तरी पहिलं वक्तव्य करायचं सोडत नाही!!)
माझे प्रयोग मी संपवल्यानंतर माझ्या रूमीने शहाणपणाने भात रांधायला घेतला आणि डाळ शिजायला ठेवली. तस्मात काय, कधीतरी स्वयपाकघरात जाऊन प्रयोग करण्यापेक्षा मराठी अस्मिता जपायचे अजून मार्ग आहेत ( आणि ते तोंडातून जात असले तरी पोटात जात नाहीत!) त्यामुळे बोलांच्या कढीभाताचे प्रयोग सुरू ठेवणे श्रेयस्कर!

7.6.07

ऐसी अक्षरे!

परवा साध्या स्केचबुकसाठी दुकानात उचकापाचक करताना अचानक कॅलिग्राफीच्या कटनिब आणि बोरू असा सगळा सेट दिसला. परत कॅलिग्राफी सुरू करायची आहे असं म्हणूनपण आता युगं लोटलेली. पण समोर ते सगळं पाहताच सेपिया मोडमधल्या दिवसांची दाटी झाली.

टोकदार पेन्सिलींनी अक्षर कोरून काढायचे दिवस ते गळणार्‍‍या पेनांनी रंगणारी बोटं सांभाळत लिहायचे दिवस,
दर रविवारी शाईनी बरबटलेली पेनं सारे भाग सुटे सुटे करत साफ करायचे दिवस,
रेनॉल्ड्च्या त्या फिक्कट निळ्या पेनापासून ते अगदी 'Made in China' वाल्या सोनेरी टोपणाच्या हिरो पेनापर्यंत प्रगती केलेले दिवस.

अशाच कुठ्ल्यातरी दिवसात कटनिबचं खूळ (अर्थातच आईच्या मते 'खूळ', आमच्यामते सुलेखनाचे प्रयत्न!) डोक्यात शिरलेलं. अर्थात त्या दिवसात पॉइंटेड छानसं पेन आणि लेदर कव्हर असलेली डायरी या अशा गोष्टींसाठी आईकडे हट्ट करताना हा एक नवीन हट्ट.
कुणातरी मैत्रिणीनं आपल्या नव्या कोर्‍या वहीत पहिल्या पानावर नाव लिहून घेतलेलं आपल्या भावाकडून ( असले सगळे भाऊ, हे भयंकर हुश्शार आणि बेक्कार माज करायचे ,आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी मस्तपैकी राबवून घ्यायचे त्या काळी!!) ते ट्पोर्‍या अक्षरातलं नाव बघून मला माझ्या वही-अक्षर जे काय असेल त्या सगळ्याची कीव यायला लागली. मग आम्हीही त्या बंधुराजांचा मॅड्सारखा पिच्छा पुरवून कटनिब पैदा केल्या आणि काय असतील ते प्रयोग सुरू केले. काही दिवस अगदी उत्साहानं केलेले प्रयोग अर्थातच थंडावले पुढं आणि परत एकदा 'बॉलपेन झिंदाबाद' मोहिमेत आम्ही सामील. ( आईच्या भाषेत नव्याचे नऊ दिवस करून झाले!)

हं.. इतकं सारं आठवलं ते बघताना आणि परत एकदा त्या वेडानं मात केली. त्याची परिणती तो अख्खा संच घेऊन येण्यात झाली. आता जे काही आणलेलं ते आधी केलेल्या कशाशीही साधर्म्य दाखवत नव्हतं. एकतर आधी कटनिब नेहमीच्या शाईपेनात बसवायची असल्याने बाकी काहीच लागायचं नाही. पण या सार्‍या आधुनिक मामल्यात जो बोरू होता तो शाईत दर २ सेकंदानी बुडवा, त्या नकट्या नाकाच्या निबला सांभाळत लिहायचा प्रयत्न करत रहा. आणि या कसरतीत ग्रेसची कविता लिहा (करा अजून उपद्व्याप आणि भोगा आपल्या कर्माची फळं!)

मराठी लिपीतले असंख्य आकार- उकार दमछाक करवत होते. साधं 'अ' घ्या, एक अर्धगोल, त्याला आणि एक अर्धगोल जोडा मग आडवी दांडी त्याला एक जोडून एक काना आणि या सगळ्याला आपल्या छ्त्रछायेखाली घेणारी एक शिरोरेषा. हुश्श.. पहिल्यांदा म्हणजे अगदी पहिल्यांदा अक्षरं गिरवताना 'अ' काढताना नक्की काय वाटलं होतं ते काही आठवत नाहीये. पण आईनं गिरवून घेतल्यावर तिला काय वाटलं असेल ते थोडं फार जाणवलं. प्रत्येक अक्षरावर धडपडत अख्खी कविता पूर्ण केली तेव्हा जग जिंकल्याचा आनंद झाला.

म्हटलं तर साधी अक्षरं, पण परप्रांतात - परदेशात आपल्याला ऑनलाईन दिसली तरी आपल्या नाळेशी जुळल्याची भावना निर्माण करतातच की. शेवटी अक्षर म्हणजे तरी काय, कुणासाठी भावनांना मूर्तरूप देण्याचं माध्यम, कुणासाठी कलेची अभिव्यक्ती तर कुणासाठी फक्त रेघोट्यांचा खेळ!

31.5.07

थोडा सा आसमान..

या, या मॅडम.. काय हवंय आपल्याला? म्हणजे कसला चष्मा हवाय? आम्ही बघा सगळ्या प्रकारचे चष्मे विकतो.. ज्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे!
चष्म्याबाहेरच जग कसं पाहिजे? हसरं, खेळकर की गंभीर? का खुसखुशीत विनोदी?

प्रत्येक क्षण टिपायची धडपड करणारं की प्रत्येकाचे अनुभव इकडून तिकडून सारखेच म्हणून आपलं वेगळेपण सर्वांआधी छापायची धडपड करणारं?
आजकाल ब्लॉग लिहायला लागल्यापासून जो लिहायचा मोड ऑन केलाय, त्यातून बाहेरचं दाखवणारा की त्यातच गुंतवणारा असा चष्मा? काही दिसलं की लिही यावर..
फुगंव शब्दांचे फुगे, आणि कर त्यावर तार्किक विश्लेषण.. शब्दांच्या छटांची भाषांतरे.. आणि त्यामागच्या भावनांच्या गुंत्यांचीही?
प्रत्येक व्यक्तीगणिक वेगळं भाषांतर, वेगळे अर्थ.. आणि या कॅलिडोस्कोपमधून पहाताना जे लिहायचं होतं ते कुठतरी हरवूनच जातंय असं काहीसं?
नक्की काय?
त्या त्या क्षणी ते ते लिहावं वाटणं म्हणजे नक्की काय?
त्या क्षणांची उत्स्फूर्त अशी प्रतिक्रिया की छापखान्याची डेड्लाइन?
स्वसमाधानाची शेखी मिरवायला, सर्जनशीलतेचा डांगोरा पिटायला की प्रतिक्रियांच्या झूली मिरवूनही अलिप्त राहायच्या भासात मश्गूल रहायला?
मॅडम, तुम्हाला त्या वक्त्याची गोष्ट माहितीये का?
अतिशय उत्तम वक्ता, प्रभावी, पण त्याचा एकच प्रॉब्लेम होता.. कुठ्लाही श्रोता नसताना तो खूप छान बोलायचा. ज्याक्षणी कुणीतरी ऍकायला लागायचं त्याक्षणी त्याची बोलती बंद. तो स्वतःच स्वतःचा श्रोता कधी झालाच नाही असं करता करता.. तुम्ही वाचता का हो तुमचं लिहिलेलं एक वाचक म्हणून? का त्यासाठी वेगळा चष्मा देऊ? तटस्थ वाचकाचा?
काय म्हणता, आजकाल तुमच्या पोस्ट्मध्ये प्रश्नांचे गुंते वाढले आहेत?
अहो, असले तर असले..
आता असलेले प्रश्न टाकून जाणार कुठे? कदाचित फक्त लिहून सुटणार नाहीत, पण लिहिल्याचं समाधान तरी..
समाधान!!
आरून फिरून गाडी परत समाधानाच्या शोधात..
का समोरचा समाधानाचा स्टॉप डोळ्याआड करताय? तो दिसावा असा चष्मा देऊ?
दूरवर पाहिलं की शांत करत जाणार्‍या समुद्रासारखं शांतवणारं सुख आणि त्याच्या जोडीला समाधान असं एकदम दिसू शकणारा चष्मा पाहिजे म्हणताय.. हं..
आपले आभाळ मोजावे आपणच
घेऊ नयेत कुणाचीही तटस्थ निरीक्षणे
सांदीफटीतून जर विशिष्ट ओळख नसलेले काही
हाताला लागले तर ते आपले आभाळच असते!

आपले आभाळ जोखावे आपणच
कुण्या दुसर्‍याने त्यात उड्डाणे भरण्याअगोदरच..
हात वर केल्यावर जे हाताला लागत नाही
ते ही असू शकते आपले आभाळच..

आपले आभाळ निरखावे आपणच..
कुण्या दुसर्‍याने त्यात सूर्यास्त चितारण्यापूर्वी
आपल्या आभाळात आपल्या नकळत
खूपदा होत असतात सूर्योदय, उल्कापात.. ग्रहणे

आपले आभाळ कमवावे आपणच
घेऊ नये कुणाचा ढगही उसना
असे उसने उसने ढग, ग्रह, तारे हे सारे मिळूनसुध्दा
दरवेळेला आभाळ बनतेच असे नाही..

आपले आभाळ समजून घ्यावे आपणच
मजेत बघावेत सटासट पडणारे तारे..
त्या आदिम सीनियर आभाळाखाली
आपले ज्युनियर आभाळ तोलत
पटापटा आपले बेसिक क्लियर करून घ्यावे
दोन्ही एकरूप होईपर्यंत!

आपल्या आभाळाच्या शोधात
आपला जन्म..
कुणालाच नकळत विरून गेलेल्या ढगासारखा
निघून जाईल कदाचित..
पण निदान आपल्याच आभाळात जाईल!
संदीपच्या त्या आभाळासाठीचा चष्मा मीही शोधतोय... सापड्ला की नक्की कळवेन!

30.5.07

रूबरू रोशनी है..

सेनापती बापट रोडवरून तुम्ही रिक्षातून जात असता, सिग्नल पडतो. अवघ्या दोन मिनिटांचा सिग्नल संपता संपत नाही लवकर, चिडचिड होते. आणि त्यात अचानक रिक्षाच्या एका बाजूने एखादा मळका हात 'ताई, काहीतरी द्या की वो..' असं म्हणून तोंड वेंगाडत उभा. त्या क्षणी काय प्रतिक्रिया असते? उदार मनाने त्याला भीक घालावी अशी की झटकून सरळ पुढं जावं अशी? भीक देऊन आपली जबाबदारी संपते असं वाटण्याची की न देता उगीच हुरहुरत रहाण्याची? हे सगळं आता अचानक लिहायचं कारण म्हणजे या रविवारी पुण्यात ( २७ मे) ड्रीमइंडिया- २०२० या संस्थेने बाल-सुधार अभियानात Anti Child-Begging Campaign ची कल्पना मांडली.

गरीब झोपडपट्टीतील मुलांना शिकवावं अशा हेतूनं मुंबईत काही आयटी वाल्यांनी सुरू केलेली ही संस्था आज पुणे, हैद्राबाद, बेंगलोर, चेन्नई आणि दिल्ली या शहरात फोफावली आहे. पुण्यात जेव्हा हा ग्रुप चालू करायचं ठरलं तेव्हा फक्त ई-मेल या माध्यमातून लोकांशी संपर्क साधला गेला,आणि त्यातून एकत्र आलेल्या मूठभर लोकांनी कसलाही अनुभव नसताना सुरू केलेले हे प्रयोग आता रजिस्टर्ड संस्था म्हणून नोंदले गेले आहेत. 'आपले घर' सारख्या अनाथाश्रमासाठी मदत करता करता 'मानव्य' सारख्या HIV ग्रस्त मुलांसाठी मदत सुरू झाली. इथवरच न थांबता हडपसरमधल्या झोपड्पट्टीत 'मस्ती की पाठशाला' सारखा उपक्रम राबवला जात आहे. 'आमच्या पोरांना कशापायी शिकवायचं? त्यापरीस त्यानला बूट्-पालीश कराया हावं..' ही पालकांची मानसिकता बदलवत 'असू दे, काम करून शिकतंय तर असूदे..' इथपर्यंतचा प्रवास लिहिताना एका ओळीत बसला तरी प्रत्यक्षात मात्र चिकाटीची कसोटी पाहणारा होता. त्यात आयटी पब्लिक म्हणजे कुणी आज इथे तर उद्या ऑनसाईट्ला, आज डेड्लाईन उद्या प्रोजेक्ट रिलिज अशा असंख्य अड्चणीतून व्हर्च्युअली ग्रुप ही संकल्पना राबवली गेली आहे.

या झोपडपट्टीतल्या मुलांना शिकवताना त्यांचा भीक मागण्याचा व्यवसाय आणि त्यामागचं दुष्ट्चक्र कळायला लागलं. मिळणारे पैसे खाण्यावर खर्च होण्यापेक्षा व्यसनात संपतात आणि न संपणार्‍या व्यसनांसाठी परत भीक्-चोर्‍या असं चक्र सुरू होत जातं. यानंतरच Anti Child-Begging Campaign ची कल्पना मांडली गेली. भीक मागणार्‍या मुलांना भीक देऊन कदाचित या चक्राला प्रोत्साहन देण्यापेक्षा खरंच त्यांना शिकायला आणि यातून बाहेर पडण्यासाठी मदत करता येऊ शकेल, असं वाटून रविवारी एम. जी. रोड्वर स्टॉल लावण्यात आला होता.

आयटीवाले म्हणजे सदैव आपल्याच नादात, त्यांना फक्त त्यांचं लाईफ सोडून काहीही माहित नसतं अशा कायम होणार्‍या तक्रारीनंतर त्याच आयटीचा उपयोग करून अवघ्या ३ लोकांनी सुरू केलेल्या या संस्थेत आज फक्त पुण्यातच साठापेक्षा जास्त सदस्य आहेत. 'जगी घाण अन चिखलच सारा' असं म्हणत सार्‍या सिस्टीमला दोष देणं हे तर आपण करू शकतोच पण, आपल्या परीने यात काहीतरी सुधारणा करायचा पर्याय अजूनही संपला नाही आहे. संस्थेचं घोषवाक्य आहे-- 'Together we can , together we should!'
एक प्रयत्न आपणही करायला काय हरकत आहे?

ता. क. 'मानव्य' बद्द्ल लिहिताना एड्सग्रस्त असा उल्लेख केला होता, चूक सुधारली आहे.

26.4.07

James, did you earn that?

रियान, शेवटी तुलापण स्वतःचं आयुष्य सार्थकी लागल्याचं सर्टिफिकेट कुणा दुसर्‍याकडून घ्यावं लागावं? युद्धातल्या त्या रणधुमाळीनंतर सगळं कळून- उमजून चुकलं तुला असं वाटलं रे!
ते धडाधडा आदळणारे बाँबगोळे,
रक्तामांसाचा सडा,
समुद्रकिनार्‍‍यावर प्रेतांचा खच
आजवर समुद्र म्हटलं की फक्त रोमँटिक भावना जुळलेल्या
रक्त - पाणी - रक्त
सगळं रोमँटिसिझम खरडून काढलंस तू..
गुळगुळीत कागदावरच्या रंगीबेरंगी बातम्या वाचायची सवय आम्हाला रे!
युद्ध कसं आकड्यांच्या भाषेत ऐकून सोडून देतो रे आम्ही..
'आजच्या गोळीबारात २ ठार १० जखमी'
एखादा सुस्कारा आणि चहाच्या घोटाबरोबर पुढली बातमी..
असं युध्द अंगावर येत रहात.. सगळं मन सुन्न करत..
तो सैनिक आईच्या आठवणीनं व्याकूळ झालेला?
आणि इमर्सन शिकवणारा तो मिलर.. युद्ध त्यालासुध्दा चकवा देऊन गेलं?
जखमींनी मरण परवडलं म्हणत कण्हायचं की 'जगलो वाचलो' म्हणून आनंदाचे उसासे टाकत रहायचं?
दोन वर्षं घरापासून दूर राहिलेला तू.. आपल्या भावांचे चेहरे आठवायच्या प्रयत्नात, पाटी परत परत कोरीच होत चाललिये का?
तत्वासाठीचं युद्ध की एकासाठी एक असं सूड घेत रहाणं?

शांतीच्या मृगजळापाठी धावत रहाणं..
का कुठ्ल्यातरी कर्तव्यापोटी करत जाणं?
प्रश्नांची उत्तरं सापडली का कधी नंतरच्या प्रवासात..
तथाकथित सुखी आयुष्य का त्यावर युद्धाची छाया येत रहाते अधुनमधुन?
आणि तुझी आई.. अशीच कासावीस होत राहिली का रे, तुम्हा चौघांच्या आठवणीनं?
'तेरी राह तके अखियां, जाने कैसा कैसा होवे जिया' ...
का एका पोराला पाहुन डोळे निवले तिचे?
Saving Private Ryan पाहताना पडलेले असंख्य प्रश्न ..कधीही न पूर्ण होणारं कोलाज..

'Earn this..' म्हणणारा मिलर आणि सभोवताली उध्वस्त इमारती..

कित्येक स्वप्नं.. आशा.. सगळ्यांना ढिगार्‍यात सामावून घेत.

आपल्या प्रश्नांचा चक्रव्यूह आणि आपणच अभिमन्यू..
.काही काही प्रश्न कधीच सुटत नाहीत, बगल देत जात रहायच?

9.4.07

प्रोग्रॅमर उवाच्!

" फक्त आत्मिक समाधान महत्वाचं! "
" हं.. आता संसार असार आहे असं म्हण आता.."
" ग्रेटच आहेस तू, तुला काय माहित मी काय म्हणणार आहे ते पुढं.. बघ म्हणुन आपली वेव्हलेंग्थ जुळते!"
"बरं, हे संसार असार कुठुन आलं? कारण ३ आठवड्यापूर्वी तू QLC वर संशोधन करत होतास आणि त्यानंतर त्या इशिता शर्माच्या प्रोजेक्टमध्ये लागल्यावर तुला 'हे जीवन सुंदर आहे' असा साक्षात्कार झालेला. आता ती एंगेज्ड आहे हे तर कळुनपण एक आठवडा झाला, मग आज हा मूड का? सकाळी आजतक ऍवजी दुसरं कुठलं चॅनेल लावलंस काय्?"
"नाही, पण हे जीवन, संसार, प्रोगॅमिंग सगळी माया आहे!"
"हा, आता IT वर माया असेल नसेल तरी यामुळे उदंड माया मिळते एवढे ठाऊक आहे बाबा. आता ही तिसरी माया मेमसाब कोण? इस दिल मे बस के देखोवाली कुणी मिळाली काय्?"
"माया मेमसाब कुठुन आली इथे? ही मायाजालातली माया आहे!"
" अरे, हळू बोल. उगाच मोठ्याने 'माया' 'माया' करू नकोस.. साहेबाला विनाकारण संशय. आधीच माझ्यावर खार खाऊन आहे तो. ए, पण तुझी कसलीतरी मीटिंग होती ना? काय झालं?"
" अरे तेच अप्रेझल मीटिंग होती.."
"सहीच.. तुझं रेटिंग चांगलं होतं ना, मग धनलाभ काही?"
"तेच तर ना, शेवटी पैसा सर्वस्व नाही रे! आत्मिक समाधानालासुध्दा काही किंमत आहेच की.."
" हो ना.. आणि पुढे?"
" अरे, आपलं काम महत्वाचं, त्यामागची आपली तळमळ महत्वाची.. पैसा काय मिळत रहातो.."
" हा उपदेश हे अप्रेझल मीटिंगच फलित वाटतं!!"
"अर्थातच्!"
" हो ना, म्हणुन साहेबाने सात कंपन्या सोडुन इथे निगोशिएट केलं वाटतं.. "
" सात?"
" हो, आणि राहिलं तुझ्या आत्मिक समाधानाचं, तर उद्यापासून त्या खडुस घरमालकाला थोडं समाधान दरमहा पोचवत जा. आणि इस्क्वेअरच्या डोअरकीपरला पण थोडं देउयात.. कसं?"
"अरे पण्,..."
" हे बघ, प्रोजेक्ट डिलीवर केल्यानंतर येणारे सगळे 'बग्ज्' प्रोग्रॅमिंग ही माया आहे अशा दृष्टिने पहा आणि अप्रेझलला मायालाभाचा दृष्टीकोन ठेव. मग बघ, ती इशितापण कसा भाव देते ते. आत्मिक समाधान याहून वेगळं असं ते काय्?"
" इति अप्रेझल-अध्यायो समाप्तः!"

26.3.07

क्रिकेट.. क्रिकेट?

दि. २३ मार्च: तुलसी-पार्वती-प्रेरणा त्रिकूटाने परत एकदा सुटकेचा नि:श्वास टाकला आहे, असे आम्हाला आमच्या खात्रीशीर सूत्रांकरवी समजते. १३ मार्चपासून या त्रयीने विश्वकरंडकामधून परतीसाठी दादरच्या सिध्दिविनायकाकडे साकडे घातल्याचे वृत्त आहे. आजच्या सामन्यानंतर परत एकदा दूरचित्रवाणीसंचाचा ताबा महिलावर्गाकडे जाण्याची शक्यता बळावली असून मंदिरा बेदी यानी याबद्दल असंतोष व्यक्त केला आहे.

'पुण्यानंद' च्या खास पत्रकार समूहाने केलेल्या संशोधनानुसार अतिशय विस्मयकारक माहिती उजेडात आली आहे. प्रा. बुध्दिसागर यांच्या मते क्रिकेटची पाळेमुळे भारताच्या इतिहासात असून त्यावर संशोधन होण्याची गरज आहे. त्यासंबंधी अधिक विचारणा केली असता त्यांनी आपल्या 'भारतीय इतिहास : महाभारतकालीन व रामायणातले संदर्भ' या प्रबंधाचा आधार दिला. वास्तविक पहाता रावणाच्या दहा तोंडामुळेच क्रिकेटमधील दहा खेळाडूंची संकल्पना अस्तित्वात आली असून शंभर कौरवांनी प्रथम विश्वकरंडकाला मूर्तरूप दिले आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच भाषातज्ञानीही याला दुजोरा दिला आहे. भाषातज्ञांच्या मते सध्याच्या काळातला 'out' हा शब्द म्हणजे 'औट' घटकेच्या खेळीवरून आला आहे. इतिहासकारांनी याला स्वातंत्र्यपूर्व कालीन संदर्भ देत चंपानेर नामक खेड्यातला क्रिकेटचा प्रसार आणि भुवन नामक शेतकरी याचे योगदान यावर टिपणी केली. सध्याच्या काळातले क्रिकेट म्हणजे भारतीयांनी केलेले पाश्चात्त्यांचे अनुकरण यावर तज्ञांचे एकमत झाले.


यावर्षीच्या दहावीतल्या पाल्यांच्या पालकांनी केलेल्या मागणीला मान देत भारतीय संघाने आपले आव्हान प्रथम फेरीत समाप्त करण्याचा निर्णय घेतला, असे आमचा बातमीदार कळवतो. भारतीयानी क्रिकेटसाठी आपला अमूल्य वेळ घालवावा, हे अत्यंत व्यथित करणारे आहे असे भारतीय कप्तान राहुल द्रविड यांनी नमूद केले आणि भारताच्या सर्वांगीण प्रगतीला हातभार म्हणून आपण हे पाऊल उचलल्याचे स्पष्ट केले.


भारतीयांच्या कार्यशीलतेला अधिकाधिक वाढवण्यासाठीचा हा निर्णय अत्यंत स्पृहणीय आहे, असे राष्ट्राध्यक्षांनी सांगून भारतीय संघाला धन्यवाद दिले आहेत. या धन्यवादांचे श्रेय कुणाचे यावर फलंदाज आणि गोलंदाज यात मतभेद असे कळते. आमच्या दैनिकाने आज संध्याकाळी 'क्रिकेटः भारताचा उदयास्त' यावर एक परिचर्चा आयोजित केली असून श्रोत्यानी त्याचा अवश्य लाभ घ्यावा. ( प्रवेश शुल्क : रू. १० श्रोत्यानी फुकट प्रवेशपत्रासाठी कृपया गळ घालू नये, ही विनंती.)

22.3.07

भारत : २०२० साली एक चिंतन

सध्या सर्वत्र 'भारताची २०२० साली होणारी संभाव्य भरभराट' आणि त्या संदर्भाने त्या वेळच्या पिढीची सुबत्ता यावर व्याख्यानमाला झडत आहेत. (नुकताच चितळेनी 'बाकरवडी: २०२० साली' असा एक परिसंवाद आयोजित केला होता. जिज्ञासूनी अधिक माहितीसाठी प्रत्यक्ष संपर्क साधावा. वेळः संध्या. ४ ते ४.३०. वि. सू. आमचा इतरत्र कुठेही ब्लॉग नाही.)
तर या पिढीच्या आरोग्याविषयी जागतिक परिषद पुण्यात भरली होती (स्थळः बापट वाडा,सोमवार पेठ) ज्याला उपस्थित रहायचे भाग्य मला लाभले. परिषदेचा एकंदर सूर असा होता की २०२० साली ह्र्दयविकार हा प्रमुख आजार असेल आणि नैसर्गिक जीवनशैली हाच यावर उपाय होऊ शकेल. या नैसर्गिक जीवनशैलीत चालणे या व्यायामप्रकारावर भर देण्यावर एकमत(!!) झाले. यासाठी सध्याच्या परिस्थितीत आपण जितके इंधनाचे स्रोत आहेत ते लवकरात लवकर संपवून भावी पिढ्याना चालणे आणि दुचाक्या यांचे प्रशिक्षण दयायला हवे.
विचार करा, २०२० साली एक शेजारीण दुसरीला म्हणते आहे," अगं, आमच्या सॅमने नवीन फेरारी दुचाकी घेतली बरं.." यावर ती नाक मुरडून म्हणते," दुचाकी!! कुठल्या जगात वावरते आहेस तू! आमचा मॅक तर ताशी १० किमीच्या गतीने चालत जातो!" मग लोक कोथरुडहुन तुळशीबागेत जायला गुगल मॅप्स् वापरतील. 'पुण्याच्या खड्ड्यातून भरधाव दुचाक्या कशा चालवाव्या' याचे प्रशिक्षण वर्ग निघतील(चालाल तर हसाल, न चालाल तर फसाल! अशा जाहिरातीसह). चालताना घ्यावयाची काळजी यावर वसंत व्याख्यानमाला रंगतील आणि 'दुचाकीवर अधिभार लावावा का' या विषयावर म. न. पा. मध्ये गदारोळ उडेल. Tour De India आयोजित केली जाईल आणि विजेत्याना पुणे- मुंबई प्रवासाइतके इंधन बक्षिस म्हणुन देण्यात येईल.
नुसत्या अशा कल्पनानी हुरळून जाऊ नका वाचकहो! या प्रगतीसाठी आपले सहकार्य अपेक्षित आहे. आज या क्षणापासून सर्वत्र गाडी वापरायचा असा निश्चय करा. कितीही जवळ असो, गाडीला अंतर न देता अंतर पार करा. ए, कोण तो प्रदूषण वगैरे बडबडतोय, तिकडे लक्ष नका देऊ, अहो, आता थोडाफार त्रास तर घ्यावा लागणारच ना रम्य भावीकालासाठी!!

18.3.07

नवी विटी, नवं राज्य!

अस्मादिकांच्या 'ब्लॉग लिहिण्याचा' प्रस्ताव अखिल मित्रसंप्रदायात इतकी खळबळ माजवेल याची यत्किंचीतही कल्पना नव्हती मला! मी ब्लॉग लिहिणार हे कळताच प्रतिकियांचा पाऊस सुरु झाला.
१. "ब्लॉग.. हम्म्.. कशाशी खातात हे तरी माहित आहे का तुला?"
२. "वेळ घालवायला काहीतरी हवं की तुला.. पण नुसतेच कळफलकावर आपटाआपटी करू नकोस.."
३. "आणखिन एक ब्लॉग झेलायला तयार रहा रे!!.."
४. "फक्त आम्हालाच का तुला सहन करावं लागावं, कर सुरुवात.."
५. " तू लिहित रहा, फळाची म्हणजे कुणी वाचेल अशी अपेक्षा नको करू. 'लेखकु उदंड जाहला' अशा युगात 'वाचकु' लाभेल न लाभेल तरी आपण लेखनप्रपंच सुरु ठेवावा हेच बरं, नाही का?"
छिद्रान्वेषीनी माझ्या लेखनप्रतिभेला अडसर घातला तरी थांबून रहाणारी मी थोडीच आहे!! :-) आपल्या इतक्या अनुभवांचा साठा जगापुढे मांडला नाही तर जग एका मोठया प्रतिभावंताला मुकेल का काय, असे वाटून मी लगेच लेखणी हाती धरली. 'येथे पाहिजे जातीचे' हे त्या वंशाला गेल्याशिवाय कळणार कसे म्हणा!!
त्यामुळे 'एकला चलो रे' च्या धर्तीवर मनाच्या गुंत्यात गुंफलेला हा शेला विणायला तरी घेतला आहे. शेवटी केल्विनच्या शब्दात सांगायच तर, 'It's magical world, Hobbes, ol' buddy.. let's go exploring!'