5.8.09

ती आणि घर

लांबच्यालांब सुट्टीवरून परत येताना तिला कधीचेच घराचे वेध लागलेले असतात. एकदा घरात जाऊन पडलं की झालं असं स्वतःलाच समजावत ती लिफ्ट्पाशी येते. रात्रभराचा प्रवासाचा थकवा सगळ्या हालचालीतून जाणवणारा. रोज न ऐकू येणारा पहाटेचा अलार्म कुठेतरी वाजतो आहे. कुलुप काढता काढता तिला आठवतं की भाजी फ्रिजमध्ये तशीच राहिलेली. इस्त्रीचे कपडे जाताना टाकलेले ते आता आणावे लागतील.

खरंतर या सुटीच्या आधी सगळ्या सगळ्याचाच कंटाळा आलेला तिला. रोज उठून आवरायचा, धडपडत ऑफिस गाठायचा, परत आल्यावर पसरलेल्या घराचा इतकंच नव्हे तर खिडक्यांना लावलेल्या पडद्यांचा पण. तरीही आता घरात शिरताना तिच्या नजरेत फक्त माया असते. स्वतःच्या घरात आहोत या जाणिवेचं उबदार अस्तर बाकी सगळ्या भावनांना लपेटून टाकतं. मग ती कितीही थकलेली असूनही कामाला लागते. अस्ताव्यस्त पसरलेल्या घरातून तिचं अस्तित्व शोधते.

तिच्या नसण्यानं रुसलेलं घर पण हळूहळू मूड्मध्ये येतं मग. किती दिवसात गॅलरीत बसून चहा प्यायला नाही हे तिला आपोआपच जाणवतं. कपाटं आवरताना कधीचं आणून ठेवलेलं कवितांचं पुस्तक सापडतं तेव्हा ती कसली खुशीत येऊन तिथेच ठाण मांडते. खिडकीतून गुलमोहराची एक फांदी अलगद हाताला लागेल अशी आलिये हे तिला आत्ताच दिसतं. आपल्याच घरात ती परत नवीन होऊन जाते मग. स्वतःलाच आठवत साठवत रहाते तिथल्या प्रत्येक खुणेसरशी. पहिल्यांदा मोगरा फुलला तेव्हा कशी ती पण बहरून गेलेली. आवरून झाल्यावर चहा घ्यायला ती कशी एका ठरावीक ठिकाणी बसायची जिथून बाहेरची वर्दळ दिसायची पण त्याचा त्रास नाही व्हायचा. मावळत्या संध्याकाळी 'भय इथले' ऐकताना कशी कावरीबावरी झालेली ती देव्हार्‍यासमोर बसून अथर्वशीर्ष म्हणत शांतावलेली. सार्‍या सार्‍या घरात फक्त तिचा सडा..

रोजच्या जगण्यातून हे सगळं विसरून गेलेली होती ती. छोटे छोटे आठवणींचे आणि स्वप्नांचे तुकडे. आषाढातला मुसळधार पाऊस पडत असताना खुर्चीत गोधडीत बसून आल्याचा चहा प्यायचं स्वप्न. कुमारांचं उड जायेगा ऐकता ऐकता बैठकीवर ओणवं पडून पुस्तक वाचायचं स्वप्न. कुंडीतल्या ब्रह्मकमळाला एकसाथ फुलं यावीत आणि त्यावेळी चंद्राच्या प्रकाशात तिथंच रात्रभर बसून रहावं.. कितीतरी स्वप्नं.. आठवणी आणि स्वप्नांची सरमिसळ झालेली. घरातल्या प्रत्येक गोष्टीवर जडलेल्या आठवणींची की आठवलेल्या स्वप्नांची. कुणा तिसर्‍याला वेडगळ वाटणारी पण तिच्या घरात रुजून गेलेली बावरी ती आणि तिची स्वप्नं.

9.4.09

Father and Daughter

ती सायकलवरून चाललेली दोघं. बहुतेक नव्यानेच सायकल शिकलेल्या छोटीची बाबाच्या बरोबरीनं नाहीतर त्याच्या पुढं सायकल नेण्याची धडपड चाललीये. पण बाबा तिच्याबरोबर आस्ते आस्ते चाललाय. टेकडी आल्यावर दमछाक झालिये तिची. पण उत्साह तितकाच. वरती झाडांशेजारी सायकल टेकवून ती समोरच्या नदीकडं पहाताना गुंगुन गेलिये. पण इतक्यात बाबा नदीपाशी गेला सुध्धा. पण नावेकडे जायच्या आधी परत आला तो. छोटीला उचलून निरोप घेतला. किनार्‍यावर बांधलेली नाव सोड्वून त्यानं वल्हवायला सुरुवात केली. छोटी बघतीये सारं. तिच्या डोळ्यात कदाचीत प्रश्नांचं काहूर. जसजशी नाव दूर चालली तशी ती अधिकाधिक अस्वस्थ. पाय उंचावून बाबाला नजरेच्या ट्प्प्यात ठेवतीये ती. अंधारायला लागल्यावर मात्र सायकल घेऊन एकटीच निघाली . येतानाचा उत्साह मावळून गेलाय आता परत जाताना.


परत ती आली बाबाची नाव शोधायला. आल्यावर झाडाशेजारी उभारून बाबाची तासंनतास वाट पहायचा तिचा नेम चुकला नाही. वादळ- वार्‍यात , पानगळीत , पावसात.. ती येत राहिली. आता तर तिला टेकडी चढायला वेळपण लागायचा नाही फारसा. आपले खांद्यावर रूळणारे केस सावरत ती येऊन थांबायची तिथे. त्या जागेशी असलेलं तिचं- स्वतःचं नातं तिलाच ठाऊक.. बाबा असता तर तिनं कित्ती किती गोष्टीं-गुपितं सांगितली असती..शाळेचा पहिला दिवस.. पहिली मैत्री.. बाबानं पोटाशी धरून कुरवाळलं असतं पहिलंवहिलं बक्षिस मिळल्यावर.. आशा आणि निराशेच्या खेळात आपणच आपली समजूत काढत रहात ती थांबायची. मग तिला मैत्रिणी मिळत गेल्या. रोजचं येणं कमी-कमी होत गेलेलं.कधीतरी भटकंती करताना आलीच तिथं तर मात्र क्षणभर का होईना थांबून जायची. 'बाबा इथेच कधीतरी भेटेल' अशा भाबड्या आशेवर 'बाबा परत न येणार्‍या जगात गेलाय ' हा व्यावहारिक शहाणपणा वरचढ ठरत गेला असेल का वाढ्त्या वयानिशी?


आयुष्याच्या नाजूक वळणावर मग तो आला. त्याच्यामागं बसून जातानाही तिची नजर झाडांच्या पलीकडे शोधत रहायची. रोजच्या रामरगाड्यात बाबाला रोज आठ्वायला वेळ तरी कुठं होता? पुढं मग ती मुलांना घेऊन यायला लागली. नदीकाठच्या हिरवळीवर बसून मुलांना खेळतानाही शोधाची एक छ्टा जिवंत होती का निरागस आठवणींचा कप्पा अलगद उघडून हरवून जायची ती? शेवटची आली ती तेव्हा हळूहळू सायकल ढकलत आणलेली . तिच्या सगळ्या प्रवासाची सायकलपण साक्षीदार, तिनं पण साथ सोडली. पण आता सूर्य मावळतीला आलाय. संध्याकाळ्च्या सावल्या जाणवत आहेत, तेव्हा पुन्हा एकदा बाबाला भेटायला आलीये ती. समोरच नदीचं वाळवंट पसरलेलं. किनार्‍यावरच्या वाळूत चालत जाताना तिला तीच नाव दिसते... तिच्या बाबानं नेलेली.आता वाळूत अडकलेली.. त्या जुन्या नावेला कुरवाळत राह्ते ती, जणू जुनी सखी भेटलीये. 'कुठं हरवली होतीस गं बयो? जगण्याच्या रखरखाटात आली असतीस तर..' बाबाच्या कुशीत जितकी शांतपणे पहुडायची तशी ती नावेपाशी पोटाशी पाय घेऊन पड्लीये आता ती. नावेशी गुजगोष्टी करत. आयुष्यभराची शोधयात्रा डोळ्यासमोर सांडलेली. सगळ्या लहानपणच्या गोष्टींना रंग चढलाय... मग इतक्यात तिला तिचे बाबा दिसला.. जाताना होता तसाच, हसर्‍या डोळ्यांचा. मधली सारी वर्षं उडून गेली आता. आणि त्याची चिमुरडी त्याला घट्ट मिठी मारून किलबिल करायला लागलीये.


प्रत्येक वळणावर मागच्या स्मॄतींचा गुंतलेला धागा आणि समाधानी वाटचालीला लागलेलं हुरहुरीचं एक हलकसं गालबोट. आयुष्यातली शोधयात्रा कशी मांडायची जमा-खर्चाच्या रकान्यात? न मिळालेल्या प्रश्नांना जपून ठेवत की नको असलेलं सत्य समजूतींच्या आड दडवत.. नात्यांचा हा चिरंतन शोध.. .


Father and Daughter(२०००)मायकेल डुबोट द विट - अ‍ॅकेडॅमी अवार्ड विनर अ‍ॅनिमेशन फिल्म