31.1.11

अमूर्ताचं काहीबाही..

काय आहे ह्या चित्रात? नुसतेच फरकाटे तर ओढलेत! जे काही मांडायचं आहे, ते स्पष्टपणे का नाही मांडत हे लोक?

नुसत्याच फ्रेम्स, काहीच न कळता मांडून ठेवल्यासारख्या. त्यातली पात्रं कसली विअर्ड वाटताहेत.. बोलून टाकावं की घडाघडा..आर्ट फिल्म म्हटलं की कळणार नाहीच असं असलंच पाहिजे का?

तासंतास चालणारी रागदारी.. कसले कसले मूड्स दाखवलेत म्हणे! ते काय कळत नाही बुवा आपल्याला. सगळं अ‍ॅबस्ट्रॅक्ट. तासभर एकच ओळ आळवत रहायची, कळत नाहीच असं काही अमूर्त असं..

अमूर्त, बरोबर.. हाच शब्द शोधतेय मी.

सरळ, साधं, सुटसुटीत, सोपं, व्यवस्थित आखीव रेखीव, चकचकीत.

एखाद्या जाहिरातीतल्या तयार घरातल्या कातलेल्या आयुष्यासारखं.

असतं का असं सारखं आजूबाजूला?

शब्दात न बसणारं, पकडीतून निसटून जाणारं, आटोकाट चौकटीत बसवायचा प्रयत्न केला तरी त्याबाहेर पसरलेलं, बदलाच्या शक्यता, अर्थांचे कवडसे मिरवत राहणारं ते

अमूर्त.

अनिश्चित असणार्‍या भविष्यासारखं विविधरंगी, भूतकाळासारखं फ्रेमबध्द नाही असं काहीतरी.

प्रत्येक भावनेला शब्दात मांडून तिचा नफातोटा न जुळवता येण्यासारखं काहीतरी.

पाहिलं की आत कुठेतरी खोलवर जखम करत जाणारं.

काहीतरी उकलत, उसवत जातंय आत, येवढं जाणवून देणारं.

आपल्या आत कुठलातरी एक मुखवट्याविना चेहरा शिल्लक आहे, त्याची ओळख पटवून देणारं.

हे सगळं अमूर्त असतं ना?

का त्याला स्वीकारायला घाबरतो आपण?

कधीकधी लख्खकन वीज चमकून जावी तसं ते येतं ही मूर्त रूपात.

ऑगस्टातल्या मरगळलेल्या, रिपरिपीत संध्याकाळी सूर्याची एकच तिरीप ढगांमधून निसटू पहाते तेव्हा ग्रेसला शरण जातोच की आपण.

ऐन थंडीतल्या संध्याकाळी नुसताच मारवा ऐकताना ऊर फुटेपर्यंत रडू येतं. कुठल्या कुठल्या आठवणींना बोलावणी धाडली जातात.

अमूर्ताला मूर्त व्हायला पण वेळ यावी लागते, तोपर्यंत त्याला मुरवत ठेवावं.

कुठल्याशा जुन्या गंधालीत लपवून.

मूर्त होण्याचे साक्षात्कार अवचितच घडतात.. त्यांच्या प्रतीक्षेत रहावं.

तोवर आहेच की अमूर्त, अ‍ॅबस्ट्रॅक्ट जुळवत रहायचं.