29.6.08

कभी फुरसत से कर लेना हिसाब..

आजचा पॅमचा आमच्या ऑफिसमधला शेवटचा दिवस. तिला कळू न देता तिच्या फेअरवेल पार्टीची सगळी तयारी करण्याची आमची धडपड. दुपारी मीटिंगच्या निमित्ताने तिला रूममध्ये बोलावून मस्त सरप्राईज दिलं तेव्हा खुललेला तिचा चेहरा. आधी 'काय शेवट्च्या दिवसापर्यंत कसल्या मीटिंग आणि कसलं काय..' असा भाव ते एकदम सगळ्यांना बघून आश्चर्य ते मग एकदम दिलखुलास हसणारी पॅम.. अवघ्या पाच मिनिटात काय वेगवेगळी दिसली. आधी तिला शुभेच्छा , तिच्याबरोबर काम करताना आलेले अनुभव असं सगळं झाल्यावर मोर्चा खाण्यावर वळला. हळुहळु लोक पांगायला लागले, तसं निरोप घ्यायची वेळ जवळ येतेय असं तिलापण जाणवलं.
निरोप घ्यायचाय, निघून सोडून जायचंय, वैताग झालाय असं सगळे कधी ना कधी तरी म्हणत असतोच, तशीच तीही. पण निरोप घ्यायची वेळ विचित्र होते.. म्हणजे हे आताच जे होतं त्यातलं थोडं हवंय, खरंतर तसं बरंचसं बरं पण आहे, नवीन ठिकाणी जाऊन सगळं नव्यानं सुरू करण्यापेक्षा हे ठिकाय, पण तरीही नव्याची ओढ आहे. आतापर्यंत केलेली मनाची तयारी, वाईट न वाटून घेता 'हे फक्त आता वाटतंय, परत आपल्या देशात गेलं की आठ्वणार पण नाही' अशी हजार मन रमवणारी उत्तरं दिली तरी निरोप घ्यायचा तो एक क्षण काही चुकत नाही. त्याची तीव्रता , त्यातलं दु:ख आहे ते आहेच. सगळं तिच्या डोळ्यात साठून आलेलं आणि ती ते थांबवायच्या प्रयत्नात.. असल्या वेळी काय काय बोलायचं असतं त्यातलं काहीच नाही बोलता येत, म्हणजे 'बयो, तू येवढ्या चिकाटीनं काम करतेस गं' किंवा ' अगं मला तुझ्याकडून हे शिकायचं होतं बघ..' असलं काही-बाही बोलावंसं वाटत असताना मला काहीच बोलता नाही येत. आली वेळ फक्त निभावून न्यायची झालं.
पण आत्ता पॅम काय विचार करत असेल.. वर्षा-दोन वर्षापूर्वी इथं येताना पोटात कशी फुलपाखरं फडफडलेली त्याचा की परत गेल्यावर काय काय गोष्टी मिस केल्या त्या करायचा की इथं कसा त्रास झाला आणि कसंकसं त्यातून सांभाळलं त्याचा..
नव्या शहरात येऊन मुळं रुजवताना आधीची पायधूळ कशी जपतात माणसं.. खरं माणसांचं आणि शहरांचं काय नातं असतं? अनोळख्या शहरात ओळखीच्या पायवाटा सापडत जातात की कुणीतरी अज्ञात मुसाफिरानं त्या आधीच मळवलेल्या असतात्..की आपल्या माणसांबरोबर शहरंपण ओळखीची वाटायला लागतात.. नक्की काय? यातलं कितपत काय बरोबर असे हिशोब तरी कसल्या आधारानं मांडतात लोक.. पूर्वानुभवांच्या की कधी मनात आलेल्या क्षणीक विचारांच्या लाटेवर स्वार होत... माहीती नाही..
कुठल्यातरी ओढीनं मजल- दरमजल करत उचललेली पावलं वळणं पार करत एका ठिकाणी थबकतात तेव्हा त्याना प्रत्येक वेळी बरोबर वाटेवर चालल्याचा थोडाच भरवसा असतो? पण तरीही माणसं हिशेब करतात, वाटा शोधतात आणि ' मुझ को पेहचानती है कहां मंझिले' म्हणत चालत रहातातच. कदाचीत वाटांची भूल कदाचित मंझिलांची ओढ..

काही नसलं तरी हातात रहातातच, गुंतलेले क्षण आणि निरोपांचे अश्रू..

8 comments:

केवळ तुज साठी...! said...

अरे व्वा स्नेहा...

अप्रतिम आहे.. प्रेत्येक वेळी जेव्हा onsite ची वारी होते, तेव्हा असेच भाव मनात दाटतात. पण ते व्यक्त करणं खूप कठिण होऊन जातं आणि जर कोणी आपलं - जवळचं, company सोडून जात असेल तर फक्त अश्रूच ते भाव प्रकट करतात.

तु हे मस्त टिपले आहेत. तुझ्या friend ला मझ्या शुभेच्छा..!

Nishad said...

Beautiful!! Especially the end. The words are simply perfect; expressing exactly what they read.
Mhantaat pratyekacha ek shahar asta. Like, you are at home in that city. Just made me think which one is mine. Trust me, I am not so sure.
The write up reminds me of this "Meri pichli mazil...jaha pe main ruka tha thodi der...aur socha tha zindagi yahi ruk jayegi...lekin shuru hona meri kismat thi...aur chalte rehna fitrat!!"
Its neat Sneha. Absolutely looking forward to the next one.

Monsieur K said...

u made this post worth the wait :)
read an absolutely fantastic post after a long time. liked the nice manner in which you have captured the emotions and the thoughts as one moves from one city to another, from one phase of life to another - maybe not everyone who experiences it, can express it - but all of those would agree that what they feel cannot be expressed in better words than yours.

keep writing. :)

Laxmikant said...

तुझ्याच शब्दात सांगायच तर एकदम डेडली लिहिलयस. आवडल आपल्याला. मी पॅमच्या निरोप समारंभाला हजर होतो पण तोच अनुभव तुझ्या नजरेतुन एका वेगाळ्याच प्रकारे पुन्हा अनुभवला. लिखते रहो हम वाचते रहेंगे.

Sangram said...

आई शप्पथ पोस्ट आहे! कोण कुठली पॅम, काही झेपता झेपता फुलटू चारी मुंड्या चीत केलेस!! एकदम झकास! तसेही साक्षात निषाद ची मराठीतून कमेंट म्हणजे बासच!

शेवट आवडला ... हा प्रवास आहे बेटांवरचा. प्रत्येक बेटावरचा रंग घेऊन जायचा. काही बेटं आवडून घ्यायचा ... तर काहींच्या प्रेमात पडायचा. एकदम सही लिहीलयस.

बाकी पुढचा पोस्ट आता किती महीन्यानी!?

mahiways said...

Really Nice Blog!!

http://mahiways.spaces.live.com

HAREKRISHNAJI said...

नविन काहीच लिहायच नाही असा निश्चय वैगरे केला आहेत काय ?

Quality Tale said...

मराठी साहित्याच्या या उपक्रमास माझ्या हार्दिक शुभेच्छा!
ही दिवाळी आपणास व आपल्या कुटुंबियांना सुख समाधानाची आणि भरभराटिची जावो!

दिवाळी निमित्य हार्दिक-हार्दिक शुभेच्छा!


आपला,

अनिरुद्ध देवधर