13.7.11

प्राक्तन

माणसाच्या जाण्याबरोबर शक्यतांचं एक भेंडोळं आपसूक हाती येऊन पडतं.
कुठून सोडवायला सुरुवात करावी हे न उमजता सामोर आलेलं.
सगळ्याच शक्यतांचा गुंता.
तू असतास तर..
किंवा आता इथे तू हवास..
तू काय म्हणाला असतास..
वैतागला असतास..
कपाळावर एकच आठी मिरवत..
किंवा खळखळून हसलाही असतास..
संध्याकाळचा प्रकाश तुझ्याच डोळ्यात परावर्तित होताना
मधाळ झाला असता..
कदाचित मिश्किल हसू उमटताना
तुझ्या चेहर्‍यावरची पेशी न पेशी नव्यानं दिसली असतीही..
अशा अनेक धाग्यांना मी एकाच वेळी सोडवू बघते..
जमत नाहीच मला.
म्हणून एक एक धागा पकडून सावकाशीनं उलगडत जावं
तेव्हा आपल्याबरोबर नवे गुंते निर्माण करत जाते.
परत एकदा अगतिक, हताश, डोळ्यातलं पाणी परतवत, त्याच्याकडे पहायचं.
सुटेल कधीतरी.
अजून एखादी भेट.
किंवा एखादा कॉल.
एखादी मेल, चॅट.
काहीच नसेल तर कुठेतरी अजून अडकून राहिलेली,
स्वप्न आणि सत्याच्या सीमारेषेवर लोंबकळणारी,
अर्धवट आठवण की कल्पनाच.
काहीतरी येईलच पुढे.
कोडं सुटेल.
तुझ्या पाऊलखुणांचा माग लागेल.
बंद केलेल्या दारांआडून तू कुठे गेला असशील याचा अंदाज येईल.
आज नाही तर उद्या.
तोपर्यंत या शक्यतांना चाचपणं येवढंच करू शकते मी.
तेच माझं प्राक्तन.
कदाचित.

4 comments:

Sangram said...

senti kiya be

Mints! said...

barech diwasani lihiles!

Girish said...

surekh lihila ahey... :)

Meghana Bhuskute said...

आवडली.
त्यातल्या ’प्राक्तन’ या शब्दाच्या वापरासकट. तो शब्द वाचला, तेव्हा त्यातल्या अगतिकतेचा सण्णकन राग आला नि मग कडू औषध गिळावं तसा तो गिळलाही गेला.
भारी आहे.