22.3.07

भारत : २०२० साली एक चिंतन

सध्या सर्वत्र 'भारताची २०२० साली होणारी संभाव्य भरभराट' आणि त्या संदर्भाने त्या वेळच्या पिढीची सुबत्ता यावर व्याख्यानमाला झडत आहेत. (नुकताच चितळेनी 'बाकरवडी: २०२० साली' असा एक परिसंवाद आयोजित केला होता. जिज्ञासूनी अधिक माहितीसाठी प्रत्यक्ष संपर्क साधावा. वेळः संध्या. ४ ते ४.३०. वि. सू. आमचा इतरत्र कुठेही ब्लॉग नाही.)
तर या पिढीच्या आरोग्याविषयी जागतिक परिषद पुण्यात भरली होती (स्थळः बापट वाडा,सोमवार पेठ) ज्याला उपस्थित रहायचे भाग्य मला लाभले. परिषदेचा एकंदर सूर असा होता की २०२० साली ह्र्दयविकार हा प्रमुख आजार असेल आणि नैसर्गिक जीवनशैली हाच यावर उपाय होऊ शकेल. या नैसर्गिक जीवनशैलीत चालणे या व्यायामप्रकारावर भर देण्यावर एकमत(!!) झाले. यासाठी सध्याच्या परिस्थितीत आपण जितके इंधनाचे स्रोत आहेत ते लवकरात लवकर संपवून भावी पिढ्याना चालणे आणि दुचाक्या यांचे प्रशिक्षण दयायला हवे.
विचार करा, २०२० साली एक शेजारीण दुसरीला म्हणते आहे," अगं, आमच्या सॅमने नवीन फेरारी दुचाकी घेतली बरं.." यावर ती नाक मुरडून म्हणते," दुचाकी!! कुठल्या जगात वावरते आहेस तू! आमचा मॅक तर ताशी १० किमीच्या गतीने चालत जातो!" मग लोक कोथरुडहुन तुळशीबागेत जायला गुगल मॅप्स् वापरतील. 'पुण्याच्या खड्ड्यातून भरधाव दुचाक्या कशा चालवाव्या' याचे प्रशिक्षण वर्ग निघतील(चालाल तर हसाल, न चालाल तर फसाल! अशा जाहिरातीसह). चालताना घ्यावयाची काळजी यावर वसंत व्याख्यानमाला रंगतील आणि 'दुचाकीवर अधिभार लावावा का' या विषयावर म. न. पा. मध्ये गदारोळ उडेल. Tour De India आयोजित केली जाईल आणि विजेत्याना पुणे- मुंबई प्रवासाइतके इंधन बक्षिस म्हणुन देण्यात येईल.
नुसत्या अशा कल्पनानी हुरळून जाऊ नका वाचकहो! या प्रगतीसाठी आपले सहकार्य अपेक्षित आहे. आज या क्षणापासून सर्वत्र गाडी वापरायचा असा निश्चय करा. कितीही जवळ असो, गाडीला अंतर न देता अंतर पार करा. ए, कोण तो प्रदूषण वगैरे बडबडतोय, तिकडे लक्ष नका देऊ, अहो, आता थोडाफार त्रास तर घ्यावा लागणारच ना रम्य भावीकालासाठी!!

7 comments:

Anonymous said...

छान वाटला लेख, पुणे तेथे काय उणे, लोक ही कल्पनापण गांभीर्याने घ्यायचे :-)

Hemant said...
This comment has been removed by the author.
Anonymous said...

atishay sundar ati sundar khup masta ....
mhanje apan lekhika aahat kaa ?
mag ekhada apala prakashita pustak wachayala avadel :) ..
me mandar cha mitra ..
atishay sundar lihilay .. sundar hya shabdachi kuthehi kamatarata padu deta nahiye me ... karan lekha atishay sundar ahe :D its just too good keep writing ...

Kaustubh said...

:)
पुण्यात असले परिसंवाद आयोजित करणाऱ्यांची आणि ते कौतुकाने ऐकायला जाणाऱ्यांची कमतरता नाही. :)

नवीन ब्लॉगसाठी शुभेच्छा !

Sneha Kulkarni said...

अनामिक, धन्यवाद!

कौस्तुभः धन्यवाद! २०२० सालीही पुणेकर 'आमच्या वेळी असं नव्हतं' असं म्हणतील अशी आशा ठेवायला हरकत नाही ना तुझी!!

HAREKRISHNAJI said...

खरे की काय ? पण तुम्हाला म्हणुन सागंतो बर का अहो चालण्यासारखा ऊत्तम व्यायाम नाही.

स्वतावर विनोद करणे फार कठीण असते. आपल्याला ही कला फार चांगली साधली आहे.आपल्या निरिक्षणाची दाद घ्यायला हवी.

चितळेनी 'बाकरवडी: २०२० ,चा इतरत्र कुठेही ब्लॉग नाही.)
जागतिक परिषद ,वसंत व्याख्यानमाला ,म. न. पा. मध्ये गदारोळ उडेल, आदी समर्पक ऊदाहरणे "मी पुणेकर" चे स्वभाव फार योग्य शब्दात दाखवतात.

Sneha Kulkarni said...

हरेकृष्णजी: धन्यवाद! आपल्या ब्लॉगवरचे पदार्थ खाल्ल्यावर चालणे 'मस्ट्' आहे ना?