30.6.07

बोलाचा भात!

"ताल्पिट.. क्या होता है ये?" माझ्या अमराठी रूममेट्ने शक्य तितका बरोबर उच्चार करत विचारलं.
" ओह, थालीपीठ ( ठ चा अगदी ठसठशीत उच्चार करत) अरे बहोत सही होता है.. मेरी मॉम बनाती है ना ( माझ्या जवळपास सगळ्या पदार्थांची सांगायची सुरवात माझी आई/मावशी/ काकू/ आत्या/ आज्जी यानी बनवलेल्या त्या पदार्थांच्या आठवणीत रमलेल्या मनाला जागं करून होते. ) तो पहले हम सारे आटे (??) आय मीन सारे फ्लोअर लेके उसमे ओनियन ( प्याज गं ,माझी बयो) डालते है और उसका गोला बनाके तवे पे थापते मतलब लगाते है.. ( हिंदीचा आणि पर्यायाने थालीपीठाच्या रेसिपीचा यथास्थित चुराडा करूनही माझ्या रूममेटच्या चेहर्‍यावरचं प्रश्नचिन्ह काय संपलं नाही.)

आता एखादीनं काय केलं असतं की एकतर गेला बाजार आपली हिंदी सुधारून चांगली रेसिपी दिली असती नाहीतर कमीतकमी थालीपीठ करून खायला घातलं असतं. पण नाही, आम्ही समस्या दिसली किंवा नसली तरी शोधून काढून त्याचे विश्लेषण करणार. तिच्या (समस्येच्या हो) मूळावर घाव घालायच्या प्रयत्नात आम्ही. तर आमचे असं का होतं? दाक्षिणात्यांची इडली-डोसा-सांबार , पंजाब्यांचे सरसों का साग आणि मक्के की रोटी इतकं जगप्रसिध्द आणि जगभर मिळत असताना आमच्या मराठी पदार्थांना काहीच 'ब्रँड व्हॅल्यू' असू नये म्हणजे काय ते! प्रश्न अगदी मराठी अस्मिता- आम्ही मराठी सदैव मागंमागंच का, अशा धोकादायक वळणांवर जाताना पाहून मी विचारांचे उधळलेले घोडे आवरले आणि पाककृतीचा शोध सुरू केला.
अस्सल मराठीतून गुगलून झाल्यावरही हव्या तशा पाककृती सापडेनात ( थालीपीठ हा एक महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ आहे यावर विकी ने थालीपीठाला खाऊन टाकलं होतं!) मराठीतून फूड ब्लॉग (अर्थात अन्न्-जालनिशी??) खूपच कमी आहेत असंही दिसलं. इंग्लिश्मधले सुरेख छायाचित्रांनी नटलेले ब्लॉग्ज पाहून खर्‍या अर्थानं रसना रसरसली. पण असे सुरेख पदार्थ माझ्या हाती आपलं सारं अस्तित्व विसरून तिसर्‍याच कशाच्या रूपात अवतीर्ण होतात हे काही नवीन नाहिये! आताही थालीपीठांनी तवा सोडायचं नाकारलं, आपलं तोंड काळं करत तव्याचा बट्ट्याबोळ करवला जेणेकरून माझ्या रूममेट्ला कुठुन ही अवदसा आठवली याचा पुनःप्रत्यय दिला.(काम आणि कंटाळा याच्या अभूतपूर्व संगमामुळे मी मागच्या पोस्टवरती अजून प्रतिक्रिया टाकतेच आहे, अशा भयानक उत्साही मला असलं काही सुचलं याचं समाधान वाटावं की केलेल्या पराक्रमामुळे थक्क व्हावं असा पेच पडला असणार तिला!! :D ) आणि वरती माझी प्रतिक्रिया होतीच, अरे मेरी मॉम ये बहोत अच्छा बनाती है.. ( खरंतर 'मी बनवलेला हा पदार्थ आतापर्यंत मी खाल्लेला सर्वोत्कृष्ट पदार्थ आहे' आणि 'माझे केस हे सगळ्यात सुंदर केस आहेत' असं म्हणणारी मुलगी/तरूणी/स्त्री/ वृद्धा मलातरी आढळलेली नाहीये, त्यामुळे मी ही काहीही केलं आणि कसंही झालं तरी पहिलं वक्तव्य करायचं सोडत नाही!!)
माझे प्रयोग मी संपवल्यानंतर माझ्या रूमीने शहाणपणाने भात रांधायला घेतला आणि डाळ शिजायला ठेवली. तस्मात काय, कधीतरी स्वयपाकघरात जाऊन प्रयोग करण्यापेक्षा मराठी अस्मिता जपायचे अजून मार्ग आहेत ( आणि ते तोंडातून जात असले तरी पोटात जात नाहीत!) त्यामुळे बोलांच्या कढीभाताचे प्रयोग सुरू ठेवणे श्रेयस्कर!

7.6.07

ऐसी अक्षरे!

परवा साध्या स्केचबुकसाठी दुकानात उचकापाचक करताना अचानक कॅलिग्राफीच्या कटनिब आणि बोरू असा सगळा सेट दिसला. परत कॅलिग्राफी सुरू करायची आहे असं म्हणूनपण आता युगं लोटलेली. पण समोर ते सगळं पाहताच सेपिया मोडमधल्या दिवसांची दाटी झाली.

टोकदार पेन्सिलींनी अक्षर कोरून काढायचे दिवस ते गळणार्‍‍या पेनांनी रंगणारी बोटं सांभाळत लिहायचे दिवस,
दर रविवारी शाईनी बरबटलेली पेनं सारे भाग सुटे सुटे करत साफ करायचे दिवस,
रेनॉल्ड्च्या त्या फिक्कट निळ्या पेनापासून ते अगदी 'Made in China' वाल्या सोनेरी टोपणाच्या हिरो पेनापर्यंत प्रगती केलेले दिवस.

अशाच कुठ्ल्यातरी दिवसात कटनिबचं खूळ (अर्थातच आईच्या मते 'खूळ', आमच्यामते सुलेखनाचे प्रयत्न!) डोक्यात शिरलेलं. अर्थात त्या दिवसात पॉइंटेड छानसं पेन आणि लेदर कव्हर असलेली डायरी या अशा गोष्टींसाठी आईकडे हट्ट करताना हा एक नवीन हट्ट.
कुणातरी मैत्रिणीनं आपल्या नव्या कोर्‍या वहीत पहिल्या पानावर नाव लिहून घेतलेलं आपल्या भावाकडून ( असले सगळे भाऊ, हे भयंकर हुश्शार आणि बेक्कार माज करायचे ,आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी मस्तपैकी राबवून घ्यायचे त्या काळी!!) ते ट्पोर्‍या अक्षरातलं नाव बघून मला माझ्या वही-अक्षर जे काय असेल त्या सगळ्याची कीव यायला लागली. मग आम्हीही त्या बंधुराजांचा मॅड्सारखा पिच्छा पुरवून कटनिब पैदा केल्या आणि काय असतील ते प्रयोग सुरू केले. काही दिवस अगदी उत्साहानं केलेले प्रयोग अर्थातच थंडावले पुढं आणि परत एकदा 'बॉलपेन झिंदाबाद' मोहिमेत आम्ही सामील. ( आईच्या भाषेत नव्याचे नऊ दिवस करून झाले!)

हं.. इतकं सारं आठवलं ते बघताना आणि परत एकदा त्या वेडानं मात केली. त्याची परिणती तो अख्खा संच घेऊन येण्यात झाली. आता जे काही आणलेलं ते आधी केलेल्या कशाशीही साधर्म्य दाखवत नव्हतं. एकतर आधी कटनिब नेहमीच्या शाईपेनात बसवायची असल्याने बाकी काहीच लागायचं नाही. पण या सार्‍या आधुनिक मामल्यात जो बोरू होता तो शाईत दर २ सेकंदानी बुडवा, त्या नकट्या नाकाच्या निबला सांभाळत लिहायचा प्रयत्न करत रहा. आणि या कसरतीत ग्रेसची कविता लिहा (करा अजून उपद्व्याप आणि भोगा आपल्या कर्माची फळं!)

मराठी लिपीतले असंख्य आकार- उकार दमछाक करवत होते. साधं 'अ' घ्या, एक अर्धगोल, त्याला आणि एक अर्धगोल जोडा मग आडवी दांडी त्याला एक जोडून एक काना आणि या सगळ्याला आपल्या छ्त्रछायेखाली घेणारी एक शिरोरेषा. हुश्श.. पहिल्यांदा म्हणजे अगदी पहिल्यांदा अक्षरं गिरवताना 'अ' काढताना नक्की काय वाटलं होतं ते काही आठवत नाहीये. पण आईनं गिरवून घेतल्यावर तिला काय वाटलं असेल ते थोडं फार जाणवलं. प्रत्येक अक्षरावर धडपडत अख्खी कविता पूर्ण केली तेव्हा जग जिंकल्याचा आनंद झाला.

म्हटलं तर साधी अक्षरं, पण परप्रांतात - परदेशात आपल्याला ऑनलाईन दिसली तरी आपल्या नाळेशी जुळल्याची भावना निर्माण करतातच की. शेवटी अक्षर म्हणजे तरी काय, कुणासाठी भावनांना मूर्तरूप देण्याचं माध्यम, कुणासाठी कलेची अभिव्यक्ती तर कुणासाठी फक्त रेघोट्यांचा खेळ!