13.7.11

प्राक्तन

माणसाच्या जाण्याबरोबर शक्यतांचं एक भेंडोळं आपसूक हाती येऊन पडतं.
कुठून सोडवायला सुरुवात करावी हे न उमजता सामोर आलेलं.
सगळ्याच शक्यतांचा गुंता.
तू असतास तर..
किंवा आता इथे तू हवास..
तू काय म्हणाला असतास..
वैतागला असतास..
कपाळावर एकच आठी मिरवत..
किंवा खळखळून हसलाही असतास..
संध्याकाळचा प्रकाश तुझ्याच डोळ्यात परावर्तित होताना
मधाळ झाला असता..
कदाचित मिश्किल हसू उमटताना
तुझ्या चेहर्‍यावरची पेशी न पेशी नव्यानं दिसली असतीही..
अशा अनेक धाग्यांना मी एकाच वेळी सोडवू बघते..
जमत नाहीच मला.
म्हणून एक एक धागा पकडून सावकाशीनं उलगडत जावं
तेव्हा आपल्याबरोबर नवे गुंते निर्माण करत जाते.
परत एकदा अगतिक, हताश, डोळ्यातलं पाणी परतवत, त्याच्याकडे पहायचं.
सुटेल कधीतरी.
अजून एखादी भेट.
किंवा एखादा कॉल.
एखादी मेल, चॅट.
काहीच नसेल तर कुठेतरी अजून अडकून राहिलेली,
स्वप्न आणि सत्याच्या सीमारेषेवर लोंबकळणारी,
अर्धवट आठवण की कल्पनाच.
काहीतरी येईलच पुढे.
कोडं सुटेल.
तुझ्या पाऊलखुणांचा माग लागेल.
बंद केलेल्या दारांआडून तू कुठे गेला असशील याचा अंदाज येईल.
आज नाही तर उद्या.
तोपर्यंत या शक्यतांना चाचपणं येवढंच करू शकते मी.
तेच माझं प्राक्तन.
कदाचित.

28.2.11

सहेला रे!

रंगलेल्या मैफीलीतून बाहेर निघताना शांत उत्साही चैतन्य वाहत असतं. काय अनुभवलं ते मांडाव कुठंतरी, लिहावं, पटकन फोन करुन कुणाला सांगावं तरी अशी भावना होत असते. इतका आनंद एकट्यानंच घेताना डोळे झरतात, त्यांच्यावर ताबा ठेवून रस्त्याकडे बघावं लागतं, कितीही घेतलं तरी आपली झोळी फाटकीच कशी त्याची जाणीव परत परत होत असते. जे काही दान कणभर घेता आलं ते पुढे ठेवायचं म्हटलं तर त्याच्या पात्रतेचं तरी मांडता येईल का असं होऊन जातं. फुलपाखरू क्षणभर हाती यावं आणि निसटताना त्याचे रंग फक्त बोटाला चिकटून रहावेत तसं काहीसं. नुसतंच लखलखणारं रंगीत अनुभवांचं विश्व!

************

कलापिनींना प्रत्यक्ष ऐकायची संधी पहिल्यांदाच मिळालेली. सकाळची दहाची वेळ. लख्ख उजळलेला रंगमंच. सगळं लक्ष त्या समोरच्या त्रिदेवींवर. मध्यभागी बसलेल्या कलापिनी. शेजारी कौशिकी आणि नंदिनी बेडेकर. तोडीचा बडा ख्याल सुरु करणार असं सांगून कलापिनींनी सुरुवात केली, एवढंच आणि इतकंच आठवतंय मला. एखादा 'सा' सुध्दा काय अनंत भाव घेऊन येतो! त्यानंतर जादूची कांडी फिरावी तसं स्थलकालाचं समग्र भान गेलंच आणि सुवर्णरंगीय उधळण सुरु झाली. कधी नितळ सुवर्णाचा शांत प्रवाह तर कधी थुईथुई नाचणारे अनंत सोनेरी कण आणि त्याला असणारं एक अनामिक आकर्षण. जणू सुवर्णाचं, चैतन्याचं विवर समोर आहे आणि त्यात खेचलं जाण्याशिवाय काही करता येणारच नाही अशी भावना क्षणोक्षणी कळून येतेय. इथे प्रतिकाराला वाव नाही, इथे आग्रहाचं आमंत्रण आहे त्या विश्वात शिरण्याचं. आणि त्यातून तुला बाहेर निघताच येणार नाही पोरी!

************

अनवट समेवर वाजणारी खंजिरी, त्याच्या आधी सुरवातीलाच षटकार ठोकत स्वतःचं वेगळेपण ठासून सांगणारा घट, मध्येच करुण आलापी घेणारी सारंगी, त्याच्याच जोडीनं येणारा पखवाज, तालाला जिवंत करत जाणारा तबला आणि या सगळ्याला बांधून ठेवणारे सूर. प्रत्येक समेवर येणारी 'वाह' ची दाद. शरीराला हजारो कान असले तरी पुरेसं ऐकता येईल की नाही अशी शंका यावी इतका ताला-लयींचा सुरेख खेळ! नेहमी 'जेवणात कस्सं मीठ बरोबर असलं तर मजा येते' तशी भूमिका घेणारी तालवाद्य इथे स्वत:ची बलस्थानं उलगडून सांगताना. आणि प्रत्यक्ष झाकीरभाईंच्या हातात तर वीज खेळत असताना हे सगळं ऐकत राहणं. खरंच दुबळी झोळी!

************

वेणूचे स्वर तळ्याकाठी ऐकू यावेत, मधूनच सतारीची एक चाहूल. या सगळ्याला वेढून जाणारा संतूरचा स्वरसमूह. तळ्याच्या काठी शांत पाण्यात पाय बुडवून बसावं तसं झालंय. पण अचानक वारा बदलतो. इतकावेळ शांत, निस्तब्ध असलेल्या तळ्याला आवाज फुटतो. पावसाच्या हलक्या सरी सुरु होतात. आणि पाण्यावर त्याचे ध्वनी उमटायला सुरुवात झालीये. हळूहळू पावसाचा जोर वाढतोय आणि इतकावेळ अशक्त वाटणारा थेंबाचा आवाज आता टिपेला पोचू पाहतोय. सगळीकडे धारा. शांतवत जाणार्‍या. नखशिखांत भिजवून टाकणार्‍या. आत खोलवर, मनाच्या तळापर्यंत त्या कोसळताहेत आणि इथे फक्त झेलण्याशिवाय काहीच करता येत नाही. शुध्द सारंगातली ही जुगलबंदी ऐकल्यावर पुढं काही अनुभवणं शक्यच नव्हतं. उरलं ते फक्त स्वरांचं गारुड!

*************

31.1.11

अमूर्ताचं काहीबाही..

काय आहे ह्या चित्रात? नुसतेच फरकाटे तर ओढलेत! जे काही मांडायचं आहे, ते स्पष्टपणे का नाही मांडत हे लोक?

नुसत्याच फ्रेम्स, काहीच न कळता मांडून ठेवल्यासारख्या. त्यातली पात्रं कसली विअर्ड वाटताहेत.. बोलून टाकावं की घडाघडा..आर्ट फिल्म म्हटलं की कळणार नाहीच असं असलंच पाहिजे का?

तासंतास चालणारी रागदारी.. कसले कसले मूड्स दाखवलेत म्हणे! ते काय कळत नाही बुवा आपल्याला. सगळं अ‍ॅबस्ट्रॅक्ट. तासभर एकच ओळ आळवत रहायची, कळत नाहीच असं काही अमूर्त असं..

अमूर्त, बरोबर.. हाच शब्द शोधतेय मी.

सरळ, साधं, सुटसुटीत, सोपं, व्यवस्थित आखीव रेखीव, चकचकीत.

एखाद्या जाहिरातीतल्या तयार घरातल्या कातलेल्या आयुष्यासारखं.

असतं का असं सारखं आजूबाजूला?

शब्दात न बसणारं, पकडीतून निसटून जाणारं, आटोकाट चौकटीत बसवायचा प्रयत्न केला तरी त्याबाहेर पसरलेलं, बदलाच्या शक्यता, अर्थांचे कवडसे मिरवत राहणारं ते

अमूर्त.

अनिश्चित असणार्‍या भविष्यासारखं विविधरंगी, भूतकाळासारखं फ्रेमबध्द नाही असं काहीतरी.

प्रत्येक भावनेला शब्दात मांडून तिचा नफातोटा न जुळवता येण्यासारखं काहीतरी.

पाहिलं की आत कुठेतरी खोलवर जखम करत जाणारं.

काहीतरी उकलत, उसवत जातंय आत, येवढं जाणवून देणारं.

आपल्या आत कुठलातरी एक मुखवट्याविना चेहरा शिल्लक आहे, त्याची ओळख पटवून देणारं.

हे सगळं अमूर्त असतं ना?

का त्याला स्वीकारायला घाबरतो आपण?

कधीकधी लख्खकन वीज चमकून जावी तसं ते येतं ही मूर्त रूपात.

ऑगस्टातल्या मरगळलेल्या, रिपरिपीत संध्याकाळी सूर्याची एकच तिरीप ढगांमधून निसटू पहाते तेव्हा ग्रेसला शरण जातोच की आपण.

ऐन थंडीतल्या संध्याकाळी नुसताच मारवा ऐकताना ऊर फुटेपर्यंत रडू येतं. कुठल्या कुठल्या आठवणींना बोलावणी धाडली जातात.

अमूर्ताला मूर्त व्हायला पण वेळ यावी लागते, तोपर्यंत त्याला मुरवत ठेवावं.

कुठल्याशा जुन्या गंधालीत लपवून.

मूर्त होण्याचे साक्षात्कार अवचितच घडतात.. त्यांच्या प्रतीक्षेत रहावं.

तोवर आहेच की अमूर्त, अ‍ॅबस्ट्रॅक्ट जुळवत रहायचं.