28.2.11

सहेला रे!

रंगलेल्या मैफीलीतून बाहेर निघताना शांत उत्साही चैतन्य वाहत असतं. काय अनुभवलं ते मांडाव कुठंतरी, लिहावं, पटकन फोन करुन कुणाला सांगावं तरी अशी भावना होत असते. इतका आनंद एकट्यानंच घेताना डोळे झरतात, त्यांच्यावर ताबा ठेवून रस्त्याकडे बघावं लागतं, कितीही घेतलं तरी आपली झोळी फाटकीच कशी त्याची जाणीव परत परत होत असते. जे काही दान कणभर घेता आलं ते पुढे ठेवायचं म्हटलं तर त्याच्या पात्रतेचं तरी मांडता येईल का असं होऊन जातं. फुलपाखरू क्षणभर हाती यावं आणि निसटताना त्याचे रंग फक्त बोटाला चिकटून रहावेत तसं काहीसं. नुसतंच लखलखणारं रंगीत अनुभवांचं विश्व!

************

कलापिनींना प्रत्यक्ष ऐकायची संधी पहिल्यांदाच मिळालेली. सकाळची दहाची वेळ. लख्ख उजळलेला रंगमंच. सगळं लक्ष त्या समोरच्या त्रिदेवींवर. मध्यभागी बसलेल्या कलापिनी. शेजारी कौशिकी आणि नंदिनी बेडेकर. तोडीचा बडा ख्याल सुरु करणार असं सांगून कलापिनींनी सुरुवात केली, एवढंच आणि इतकंच आठवतंय मला. एखादा 'सा' सुध्दा काय अनंत भाव घेऊन येतो! त्यानंतर जादूची कांडी फिरावी तसं स्थलकालाचं समग्र भान गेलंच आणि सुवर्णरंगीय उधळण सुरु झाली. कधी नितळ सुवर्णाचा शांत प्रवाह तर कधी थुईथुई नाचणारे अनंत सोनेरी कण आणि त्याला असणारं एक अनामिक आकर्षण. जणू सुवर्णाचं, चैतन्याचं विवर समोर आहे आणि त्यात खेचलं जाण्याशिवाय काही करता येणारच नाही अशी भावना क्षणोक्षणी कळून येतेय. इथे प्रतिकाराला वाव नाही, इथे आग्रहाचं आमंत्रण आहे त्या विश्वात शिरण्याचं. आणि त्यातून तुला बाहेर निघताच येणार नाही पोरी!

************

अनवट समेवर वाजणारी खंजिरी, त्याच्या आधी सुरवातीलाच षटकार ठोकत स्वतःचं वेगळेपण ठासून सांगणारा घट, मध्येच करुण आलापी घेणारी सारंगी, त्याच्याच जोडीनं येणारा पखवाज, तालाला जिवंत करत जाणारा तबला आणि या सगळ्याला बांधून ठेवणारे सूर. प्रत्येक समेवर येणारी 'वाह' ची दाद. शरीराला हजारो कान असले तरी पुरेसं ऐकता येईल की नाही अशी शंका यावी इतका ताला-लयींचा सुरेख खेळ! नेहमी 'जेवणात कस्सं मीठ बरोबर असलं तर मजा येते' तशी भूमिका घेणारी तालवाद्य इथे स्वत:ची बलस्थानं उलगडून सांगताना. आणि प्रत्यक्ष झाकीरभाईंच्या हातात तर वीज खेळत असताना हे सगळं ऐकत राहणं. खरंच दुबळी झोळी!

************

वेणूचे स्वर तळ्याकाठी ऐकू यावेत, मधूनच सतारीची एक चाहूल. या सगळ्याला वेढून जाणारा संतूरचा स्वरसमूह. तळ्याच्या काठी शांत पाण्यात पाय बुडवून बसावं तसं झालंय. पण अचानक वारा बदलतो. इतकावेळ शांत, निस्तब्ध असलेल्या तळ्याला आवाज फुटतो. पावसाच्या हलक्या सरी सुरु होतात. आणि पाण्यावर त्याचे ध्वनी उमटायला सुरुवात झालीये. हळूहळू पावसाचा जोर वाढतोय आणि इतकावेळ अशक्त वाटणारा थेंबाचा आवाज आता टिपेला पोचू पाहतोय. सगळीकडे धारा. शांतवत जाणार्‍या. नखशिखांत भिजवून टाकणार्‍या. आत खोलवर, मनाच्या तळापर्यंत त्या कोसळताहेत आणि इथे फक्त झेलण्याशिवाय काहीच करता येत नाही. शुध्द सारंगातली ही जुगलबंदी ऐकल्यावर पुढं काही अनुभवणं शक्यच नव्हतं. उरलं ते फक्त स्वरांचं गारुड!

*************