1.8.10

स्वप्नातल्या कळ्यांनो..

काही स्वयंसेवी संस्थांना भेटण्याचा योग कामानिमित्त आला. तेव्हा एकूणच संस्था सुरू कशी झाली , तिचा वाढत गेलेला व्याप अशा संदर्भात बोलणं झालं. कुठल्यातरी स्वप्नानं भारलेली ही माणसं. त्याला मूर्त स्वरूप देण्यासाठी झटली/ झटत आहेत. पण त्यातच 'आम्ही आमच्या स्वप्नात कुणाला वाटेकरी केलं नाही,एकट्यानंच प्रवास केला 'असं एक वाक्य ऐकल्यावर मी थोडीशी थबकले.
मान्य आहे, की स्वप्नं ही आपली. आपल्यापुरती जोपासलेली. पण संस्थेचा घाट घालतानाची सुध्दा? ज्यामुळे कित्येक लोकांवर परिणाम होऊ शकतो अशी फक्त स्वप्नं एकट्यानंच पहायची आणि घडवायची? क्षणभर त्या कामाचा आवाका पाहून दडपायला झालं. पण आपल्या कल्पना दुसर्‍याना पटवून देताना, दहा जणांना त्यात जागा देताना त्याच्या चिंधड्या व्हायच्या शक्यताच जास्त. जी कल्पना डोक्यात आहे ती तशीच उतरवता येत नाही प्रत्यक्षात, तेव्हांची तडफड आणि त्याहीपेक्षा मूर्त स्वरूप आल्यावर कदाचित झालेलं अपेक्षाभंगाचं दु:ख.
सगळंच आपल्यापरीनं बरोबर.
पण मग संस्थेच्या पातळीवर जेव्हा हे आजचे स्वप्नकर्ते उद्या नसतील तेव्हा काय? कुठल्या नव्या कल्पनांचे साचे रेडिमेड मिळणार हाताखालच्या लोकांना नंतर, असंही आहेच की. मग आहेच ठरलेल्या वाटेवरून जात रहात कुठलीही नवी गोष्ट अब्रह्मण्यंच्या थाटात नाकारणं. किंवा होत जाणारा र्‍हास आणि मूळ स्वप्नापासूनची होत गेलेली फारकत.

***********************
सुझन बॉयलला जेव्हा पहिल्याप्रथम पाहिलं तेव्हा तमाम जनतेप्रमाणं मलाही अपार सहानुभूती दाटलेली. कशाला ही बाई स्वत:चं हसं करून घेतेय असंच वाटलेलं. पण तिनं पहिला सूर लावला आणि त्या सार्‍या शंका फिटल्याच.
I dreamed a dream!
कसलं गाणं होतं ते. पाहिलेली स्वप्नं, रंगीबेरंगी, आशेची किरणं असलेली. आयुष्यानं त्या सगळ्याला निर्दयीपणाने तुडवलं त्याचा आक्रोश. सरकन काटाच उभा राहिला अंगावर. अजूनही कधीतरी कातरवेळी लावलं तर तस्संच होतं खरं.
स्वप्न काय असतं? निव्वळ आशावाद? अमूर्त कल्पना? जगायला नवी उमेद?
आणि त्यांना घडलेलं पहाणं म्हणजे काय? त्यांना जखमी,रक्तबंबाळ करणं?
त्यांच्याबरोबर झगडताना स्वतःला कणाकणानं खंबीर करत जाणं?
किंवा कोसळून जाणंही?
कदाचित सगळंच.
आणि त्याचा रंग? रंग म्हणताच एक टेररिस्ट्चा सीन आठवला. मृत्यूच्या कठड्यावर उभी असलेली नायिका. गर्भवती. आता एका क्षणात सगळं संपेलच. तिचा निर्धार आहेच तसा. ती आणि त्याबरोबर तो इवलासा जीवसुध्दा. संघटनेच्या उद्दिष्टापुढे हे सर्व व्यर्थ असं मानत गेलेली ती. तिला त्या लहानग्याची स्वप्नं नव्हतीच पडलेली फारशी, मग त्या शेवटच्या क्षणी फक्त एक ब्लँक फ्रेम येते आणि एक हुंकार. ती क्षणभर थांबते.
काय आहे हे? त्या बाळाचं स्वप्न? कधीही न पाहिलेलं? आणि तरीही इतकं लोभस वाटावं असं.
ती निर्णय बदलते.

स्वप्नांना कायम रंग चढलेच पाहिजेत असं नाही. अशी रिकामी स्वप्नंही असतात .
कमालीची सुंदर.

**********************
सोनचाफ्याच्या लख्ख सुगंधाचं स्वप्न पाहिलेलं मी
तुझ्या सुगंधी ओंजळीतून
प्रत्येकवेळी जागी झाल्यावर तुला सांगायचं ठरवूनही राहून गेलंच ते
आता चाफ्याचा गंधही टोचत राहतो
आणि आताशा लख्ख स्वप्नं सोसतही नाहीत.

*********************