7.6.07

ऐसी अक्षरे!

परवा साध्या स्केचबुकसाठी दुकानात उचकापाचक करताना अचानक कॅलिग्राफीच्या कटनिब आणि बोरू असा सगळा सेट दिसला. परत कॅलिग्राफी सुरू करायची आहे असं म्हणूनपण आता युगं लोटलेली. पण समोर ते सगळं पाहताच सेपिया मोडमधल्या दिवसांची दाटी झाली.

टोकदार पेन्सिलींनी अक्षर कोरून काढायचे दिवस ते गळणार्‍‍या पेनांनी रंगणारी बोटं सांभाळत लिहायचे दिवस,
दर रविवारी शाईनी बरबटलेली पेनं सारे भाग सुटे सुटे करत साफ करायचे दिवस,
रेनॉल्ड्च्या त्या फिक्कट निळ्या पेनापासून ते अगदी 'Made in China' वाल्या सोनेरी टोपणाच्या हिरो पेनापर्यंत प्रगती केलेले दिवस.

अशाच कुठ्ल्यातरी दिवसात कटनिबचं खूळ (अर्थातच आईच्या मते 'खूळ', आमच्यामते सुलेखनाचे प्रयत्न!) डोक्यात शिरलेलं. अर्थात त्या दिवसात पॉइंटेड छानसं पेन आणि लेदर कव्हर असलेली डायरी या अशा गोष्टींसाठी आईकडे हट्ट करताना हा एक नवीन हट्ट.
कुणातरी मैत्रिणीनं आपल्या नव्या कोर्‍या वहीत पहिल्या पानावर नाव लिहून घेतलेलं आपल्या भावाकडून ( असले सगळे भाऊ, हे भयंकर हुश्शार आणि बेक्कार माज करायचे ,आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी मस्तपैकी राबवून घ्यायचे त्या काळी!!) ते ट्पोर्‍या अक्षरातलं नाव बघून मला माझ्या वही-अक्षर जे काय असेल त्या सगळ्याची कीव यायला लागली. मग आम्हीही त्या बंधुराजांचा मॅड्सारखा पिच्छा पुरवून कटनिब पैदा केल्या आणि काय असतील ते प्रयोग सुरू केले. काही दिवस अगदी उत्साहानं केलेले प्रयोग अर्थातच थंडावले पुढं आणि परत एकदा 'बॉलपेन झिंदाबाद' मोहिमेत आम्ही सामील. ( आईच्या भाषेत नव्याचे नऊ दिवस करून झाले!)

हं.. इतकं सारं आठवलं ते बघताना आणि परत एकदा त्या वेडानं मात केली. त्याची परिणती तो अख्खा संच घेऊन येण्यात झाली. आता जे काही आणलेलं ते आधी केलेल्या कशाशीही साधर्म्य दाखवत नव्हतं. एकतर आधी कटनिब नेहमीच्या शाईपेनात बसवायची असल्याने बाकी काहीच लागायचं नाही. पण या सार्‍या आधुनिक मामल्यात जो बोरू होता तो शाईत दर २ सेकंदानी बुडवा, त्या नकट्या नाकाच्या निबला सांभाळत लिहायचा प्रयत्न करत रहा. आणि या कसरतीत ग्रेसची कविता लिहा (करा अजून उपद्व्याप आणि भोगा आपल्या कर्माची फळं!)

मराठी लिपीतले असंख्य आकार- उकार दमछाक करवत होते. साधं 'अ' घ्या, एक अर्धगोल, त्याला आणि एक अर्धगोल जोडा मग आडवी दांडी त्याला एक जोडून एक काना आणि या सगळ्याला आपल्या छ्त्रछायेखाली घेणारी एक शिरोरेषा. हुश्श.. पहिल्यांदा म्हणजे अगदी पहिल्यांदा अक्षरं गिरवताना 'अ' काढताना नक्की काय वाटलं होतं ते काही आठवत नाहीये. पण आईनं गिरवून घेतल्यावर तिला काय वाटलं असेल ते थोडं फार जाणवलं. प्रत्येक अक्षरावर धडपडत अख्खी कविता पूर्ण केली तेव्हा जग जिंकल्याचा आनंद झाला.

म्हटलं तर साधी अक्षरं, पण परप्रांतात - परदेशात आपल्याला ऑनलाईन दिसली तरी आपल्या नाळेशी जुळल्याची भावना निर्माण करतातच की. शेवटी अक्षर म्हणजे तरी काय, कुणासाठी भावनांना मूर्तरूप देण्याचं माध्यम, कुणासाठी कलेची अभिव्यक्ती तर कुणासाठी फक्त रेघोट्यांचा खेळ!

11 comments:

Anonymous said...

वळणदार आहे लेख :-) आवडला...

माझ्या बाबत माझी (तथाकथीत) अभिव्यक्ती ही बाकीच्यांसाठी - खासकरून मास्तर जमातीसाठी- रेघोट्या असायची.
कितीतरी पेनं आणि पेन्शीली वापरून पाहील्या, पण हमखास वाचनीय अक्षर काढून देणारं काही त्यावेळी भेटले नाही.
की-बोर्डानं मात्र हा प्रश्न हातोहात सोडवला.

बाकी जुने दिवस आठवले आणि मजा वाटली, शाईपेनासारखे दुसऱ्याचा शर्ट खराब करणारे अस्त्र पुन्हा होणे नाही!

...मृण्मय

Samved said...

अरे..एकदम मजा आली. आता टाईप करतोय म्हणून माझं सीक्रेट कुणाला कळत नाहीये..पण याचे पाय त्याला या जमातीत असल्यामुळे आम्ही असले प्रयत्न नुस्तेच बघीतले. फार कठीण असतात म्हणे! आणि तुझं ते भाऊ वालं वाक्य लय भारी!!! मी पण ताबडायचो माझ्या बहीणीला...
आणि अचानक ग्रेसची कविता काय म्हणून? सध्या ग्रेसफुल सीझन आलाय वाटतं (अत्यंत क दर्जाचा pj आहे तरीही...)
पण हे अस्लं अक्षर फार भारी दिस्तं. जमलं तर scan करुन टाकं blogवर

HAREKRISHNAJI said...

Please put your art on the blog, let us also enjoy


well I still use 'Made in China' वाल्या सोनेरी टोपणाच हिरो पेन

Vidya Bhutkar said...

छान लिहितेस तू. एखाद्या पेनला जीव लावण्य़ाइतके वापरलेच नाहीये गेल्या काही वर्षात. पण जुन्या आठवणी जाग्या झाल्या वाचून. :-)
ते जाडे 'मेड इन चायना' शाईपेन अजूनही आठवतात. पण मला बॉलपनवर कधी प्रेम बसलं नाही. शाईपेनची मजा वेगळीच. :-)
मला लहाणपणी बाबांची जुनी वही मिळाली आणि त्यांचं ते बोरुच्या पेनंचं अक्षर बघून मी ही हट्टाने बोरु घेतला आणि मग शाई संपल्यावर धुण्याची नीळ वापरली म्हणून आईच्या शिव्या खाल्ल्या.
:-)
-विद्या.

ओहित म्हणे said...

बराच वेळ घेतलास की हे पोस्ट टाकायला. की ईतके दिवस प्रयत्न सुरू होते? सुंदर अक्षर हाच खरा दागिना म्हणणाऱ्याचा कायम राग येई. जाते काय यांचे म्हणायला? ईथे वळण देता देता नाकी नऊ काय त्यांच्या येतात होय?

पण असो. असेच लहानपणीच्या आवडी परत जिवंत करायला मजा आली. :)

लगे रहो... आणि संवेद म्हणाला तसे ... स्कॅन करून टाक की ईथे काय पराक्रम केलेस ते!

Nandan said...

म्हटलं तर साधी अक्षरं, पण परप्रांतात - परदेशात आपल्याला ऑनलाईन दिसली तरी आपल्या नाळेशी जुळल्याची भावना निर्माण करतातच की. -- agadee khara. pratham jevha manogatvarache vaLaNadaar fonts pahile hote, tevha khoop bara vaaTala hota. baki 'sepia modemadhale divas' haa vak-prachaar aavaDalaa!

'Aani granthopajeeviye' surekh aahe. asach kahisa mee mazya blog var suru kela hota, paN mukha-pRuShThaanche photos miLaNe mushkil hou laagalyaavar to naad sodun dila :(

Meghana Bhuskute said...

शाईपेन... कसला जिव्हाळ्याचा विषय! मधले काही दिवस तर मला ’लोक शाईपेनाशिवाय कसे काय लिहितात बुवा..’ असं एक निर्मळ आश्चर्य वाटत असे. तेही दिवस ओसरले आणि ’अरे, शाईपेनानं लिहितेस तू? सहीच...’ असल्या अप्रूपाच्या प्रतिक्रिया सहज गोड हसून, किंचित सहनशील तुच्छतेनं झेलायचीपण सवय झाली. आता काही पत्रांशिवाय पेनाला हातच लागेनासा झालाय...
मजाय...
एकंदरीत मजा आली. :)

Samved said...

अरे..तुझा scanner भारी दिसतोय..तू अजून scan करुन post टाकतेच आहेस की...
जाऊदे...पुढचा blog लिहून टाक आता

Sneha Kulkarni said...

मृण्मयः शाईपेनाचा अस्त्र म्हणून उपयोग.. सही आठवण केलीस!!

विद्या: नीळीची कल्पना.. एकदम Innovative!! :)

मेघना: अगदी मनातलं बोललीस!

नंदनः तो चित्रांचा प्रयोग सुरू केलाय तरी, पाहूया किती दिवस चालतात नव्याचे नऊ दिवस.. :)

रोहित आणि हरेकृष्णजी: कॅलिग्राफीचा फोटो टाकायचा होता, लवकरच टाकेन म्हणते! :D

संवेदः : नवीन पोस्ट टाकलीये. आणि तुझ्या 'जमलं तर' ला मी फारच मनावर घेऊन अजून जमवते आहे :)

Anonymous said...

खरच जुन्या आठवणीं एकदम मनात उठून बसल्या...खूप छान ..
मी लहान आसताना 20 पैशे लागायचे दुकानातून शाई भरण्यासाठी...कधी मग शाई वाहीच्या पानावर शिंपडून मग ते पान बरोबर मधे मूडपून चित्रकारीही करायचो...

HAREKRISHNAJI said...

रोहित आणि हरेकृष्णजी: कॅलिग्राफीचा फोटो टाकायचा होता, लवकरच टाकेन म्हणते! ? when ?