नवं नवं म्हणता म्हणता शहर सवयीचं होऊन गेलं आणि आता परतीच्या प्रवासाचे वेध पण लागलेत. आधी रूळेपर्यंत या नव्या शहरांचं नव्या प्राण्यासारखं असतं, माणसाळायला वेळ घेतात, कधी अंगावर येतात आणि कधी अशी सवयीची होउन जातात की मागचे सारे ओरखडे कधी पुसट झालेत ते जाणवूही देत नाहीत. पण सुरवातीला कितीही नाही म्हटलं तरी आधीच्या जागांबरोबर तुलना होतेच. तिथले मॅप्स जास्त चांगले आहेत, अमक्या ठिकाणी airport कस्स्ला मोठा आहे, हे तर कसलं गाव आहे त्यापुढे... मनात एक प्रोसेस सुरु असतेच अशा खोड्या काढायची.
हळूहळू हातात मॅप पकडून , नेट्वरून जायचा येण्याचा माग काढत एकदम टूरिस्ट स्टाईलने सगळ्या इमारतींवर लेबलं लावली जातात. म्हणजे ही अर्धगोलाकर आहे ना तिथून वळून गेलं की ट्रेन स्टेशन किंवा त्या ब्रिजच्या मागे एक चौक ओलांडला की सुपरमार्केट. या धांदलीत आजूबाजूचे लोक फारसे पाहिले नाही जात. रस्ता विचारणं किंवा काहीतरी अतर्क्य वेशभूषा असेल तेवढंच. एकदा का रस्ते सवयीचे झाले की ट्रेनमध्ये शेजारी बसलेल्या, उभारलेल्या, आणि तरंगत पुस्तक वाचणार्या सगळ्यांचे निरीक्षण सुरू होतं. काय अधांतरी वाचतोय हा? हिची झोप नाही वाटतं झाली पूर्ण.. तोंडात माशी गेली तरी कळणार नाही ...आता हिला उठवून सांगीतलं की तुझं स्टेशन निघून गेलं तर काय करेल ही? पळत जाऊन दारापाशी उभी राहील बघत की मलाच वेड्यात काढेल? नुसतंच कल्पनांशी खेळत रहायचं. अरे, या ड्रेसचं काँबिनेशन मस्त आहे, चेरी रेड A लाईन ड्रेस आणि काळे स्टॉकिंग्जस्...हं..कूल... एवढं म्हणेपर्यंत काकूनी चक्क क्रोशाचं विणकाम सुरू करून धक्का देऊन टाकलेला. नुस्ताच निरीक्षणांचा खच आणि अंदाजपंचे धागोदरसे.
शहर सोडताना यातलं काय काय वागवायचं बरोबर? लोक नाही, जागा तर नाहीच नाही आणि आठवणी ना धड रुजलेल्या ना सोडता येणार्या.का जे राहीलं ते राहीलं आणि जे सुटलं ते रुजलंच नाही म्हणून सोडून द्यायचं... पण मग आपण ते रुजू नाही दिलं याची बोच कधीतरी जाणवेल का? किंवा जाणवावी का?स्टीव्ह जॉब्स म्हणतो तसं सगळे डॉटस् कनेक्ट होणार आहेत पुढं. पण ते कसे होणार ते मला आत्ताच कसं कळेल? कदाचित या आठवणी, लोक, आणि जागा रुजल्याही असतील कुठेतरी. कधीतरी याही आठवणींनी नॉस्टॅल्जीक व्हायला होईल. सध्यातरी नुस्ताच सगळा गुंता. प्रत्येक वेळी मागे वळून पाहीलं तरी पुसून गेलेला रस्ता आणि पुढचा तर ठाऊकच नाही अशा वळणावर येऊन थांबणारी मी. तरी सिंदबादसारखी पुढच्या प्रवासाची खुमखुमी पाठ नाही सोडत.
इथं काय शितं सांडायची होती ती झाली, आता वेध पुढच्या वाटांचे. कदाचित मुक्कामापेक्षा वाटांचीच भूल पडावी असंच असावं.
31.3.10
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
मंजिलसे बेहतर लगने लगे है ... ये रासते!! असला प्रकार आहे! चालत जा गं ... अर्थ लागत जाइल. लहान लहान अशा विटानींच काहीतरी बनत जाइल. Connecting Dots!
बऱ्याचदा बरेचसे अनुभव इतके लहानसे असतात नं, की त्यांचं अस्तित्वही का आहे हे कळत नाही. जसं सुटलेलं, रुजलेलं, असं राहिलेलं सगळं. पण लागतो अर्थ सगळ्याचा. तू फक्त हे सगळं गोळा करत जा.
Masta post, aavaDale.
mala hacha anubhav aala hota kahi weles.
http://rajkashana.blogspot.com/2009/05/tale-of-many-cities.html
Post a Comment