19.4.10

प्रवास

कचकन ब्रेक दाबून बस थांबली तशी ती एका क्षणात जागी झाली. जागी झाल्या झाल्या जाणिव झाली की तोंड कोरडं पडलंय आणि पाठीला रग लागलीये. एकतर खड्ड्यांनी भरलेला रस्ता आणि पुढंमागं हलवतासुध्दा न येणारी सीट. समोर अडकवलेल्या पिशवीतून बाटली काढून तिनं तोंडाला लावली. काही वेळापूर्वी थंडगार लागणारं पाणी कोमट झालेलं आणि मचूळ लागंत होतं. एक घोट घेताच तहान संपली. शेजारच्या सीटवर अस्ताव्यस्त पसरलेली मध्यमवयीन बाई. अगदी रूमाल डोक्याला गुंडाळून पर्स पोटाशी धरून. तिच्याच वयाची किंवा लहानच असेल एखाद वर्षं. तिच्या खांद्यावर डोकं ठेवून निवांत झोपलेली. पायाशी तिच्याच दोन पिशव्या. बहुतेक नवरा आलेला तिला सोडायला. शेजारी लेडीजच आहे का हे दहांदा विचारून मग तिच्या नवर्‍यानं तिकिट काढलेलं. गाडी सुटेपर्यंत तिनं केलेल्या हजार सूचना आणि तरीही शेवटी गाडी सुटताना हिच्या अंगावर रेलतच खिडकीतून 'मी फोन करते पोचल्यावर' अशा अर्थाच्या केलेल्या खाणाखुणा. तिला एकच क्षणी तिचा मत्सर आणि तुच्छ्ता जाणवून गेली. बरी झोप लागते यांना अशी. आपल्याला म्हणजे सरळ लागलेली झोप अशी अध्येमध्येच तुटली की पुढचा सगळा प्रवास डोळे टक्क उघडे. तिनं थोडाफार खांदा सोडवायची धडपड केली पण दुसर्‍याच मिनिटाला खांद्यावर टेकू आहेच. तिनं नाद सोडलाच मग.

बस नक्की कशासाठी थांबलीये ते काही कळत नव्हतं. खिडकीतून भिरीभिरी वारं येत होतं थोडंफार. तिनं अजून थोडी खिडकी उघडली आणि बाहेर मान काढून बघायचा व्यर्थ प्रयत्न केला. मागच्या गाडीचा हेडलाईट आणि पुढच्या दोन चार गाड्यांच्या सावल्या येवढं सोडून काहीही दिसत नव्हतं. डाव्या बाजूला कसलंतरी शेत असावं किंवा नुसतंच माळरान. दूर कुठेतरी एखादा पट्टा चंदेरी चकाकत होता. दूरवर चारकोलने गिरगिटावा तसा झुडपांचा पट्टा दिसत होता. अधूनमधून एखादा दिवा. त्या पट्टयाच्या मध्ये लांबवर पसरलेला काळसर फिकुटत गेलेला निळा आणि आकाशात सुरेखशी चंद्रकोर. अगदी पौर्णिमा नव्हे पण अगदी भरलेल्या दिवसांची वाटणारी. कसला सुरेख निळा आहे.. निळ्यावरून ती कुठलीतरी कविता म्हणायचा ना अभी. .. काय बरं ...'आकाशीच्या घुमटाचा एक गोलसर निळा..' ती म्हणायला लावायची त्याला ती कविता कधीही मूड येइल तेव्हा. जणू काही ते सारे निळे त्याच्याचभोवती फेर धरत आहेत असा डोळे मिटून कसल्याशा तंद्रीत असायचा तो. आणि बरोबर इंदिवर निळ्याची ओळ आली की तो डोळे उघडून तिला लक्षात आहे का त्यासाठी पहायचा. अर्थातच तिला लक्षात असायचंच, पण तरीही तो सांगतोय परत तर का थांबवा म्हणून ती ऐकून घ्यायची. त्या निळ्यावरून काय काय चालू करायचा तो. निळा म्हणजे वरवर शांत पण हात लावशील तसा मन मोकळं करत जाणारा. त्याच्या पोटात किती दु:ख किती वेदना साठवलेल्या ते ज्याचं त्यालाच कळतं. अगदी गॉगच्या स्टारी नाईटपासून ते मग अख्खा गॉग त्याच्या गुणवैशिष्टांसकट वाचल्याशिवाय त्याला चैन कुठलं पडायला. तिला खरंतर त्याचं फारसं कळायचं नाही. तिला खर्‍याखुर्‍या दिसणार्‍या गोष्टी लागायच्या.हात लावून कळणार्‍या , समोर मांडलेल्या दिसणार्‍या. त्याच्या भाषेत सांगायचं तर ऑडिट करता येणार्‍या आणि अ‍ॅप्रिशिएट किंवा डिप्रिशिएट होणार्‍या.


'ओ डायवर का थांबून राहिलायसा.. काय अक्शीडेंट झाला का काय? '

कुणाच्या तरी आवाजानं तिची तंद्री भंगली. ड्रायव्हरनं एक पिचकारी खिडकीतून टाकत सांगितलं की कंडक्टर उतरलाय खाली तेव्हा कळेलच काय झालंय ते. किती वाजलेत ते तरी पहावं म्हणून तिनं सेल काढला. रात्रीचे तीन वाजून गेलेले. जर इथे न थांबती तर बस दोन तीन तासात पोचेल मुक्कामाला. सकाळी वेळेवर पोचता येइल म्हणून ही बस घेतली आणि आता कितीवेळ तरंगत रहावं लागणार काय ठाऊक या विचारानं थोडी चिडचिड झालीच तिची. अभीला मेसेज टाकावा का या विचारात तिनं मेसेज बॉक्स उघडला. मी इथे अशी अडकून पडल्येय किंवा परवा सकाळी घरी पोचेन असं दोनतीनदा लिहून खोडून झाल्यावर पण नक्की काय लिहायचं ते कळेना तेव्हा बराच वेळ त्या हलणार्‍या कर्सरकडे पहात बसली. या टूरला बाहेर पडले त्याआधीच तो त्याच्या एक्झिबिशनमध्ये अडकलेला. त्याला निघालेय ते सांगायची संधीच नाही मिळाली तेव्हा मांकडेच निरोप ठेवला झालं. पण हे असं मांना मध्ये आणून पण किती दिवस झाले.. आठाठ दिवस ज्याला खबर नसते आपली तो आत्ताचा जीवाचा वैताग वैताग करणारा अभी का आठवतोय आताच्या क्षणी? मग तो मगाशी आठवलेला हसरा अभी कुठल्या काळातला?

'काय कंडक्टर , काय झालंय?'
' एक कार ब्येक्कार आपटलीये बगा. माणूस जित्ता र्‍हायची काय खात्री न्हाय. पोलीस आल्याती, निगेल आत्ता ट्रेफिक.'

कंडक्टरनं सांगितलं तरीही माणसं उगाचच पाय मोकळे करायला बाहेर पडली. बायांच्या सुस्कारांनी आणि कुठेतरी एखाद्या पोरानं रडण्याचा सूर लावून एवढावेळ शांत वाटणारी बस पुन्हा माणसांनी भरलेली जिवंत केली. तिच्या शेजारच्या बाईनेपण मध्येच एकदा 'का थांबलीये बस " असं विचारून उत्तर मिळायच्या आत झोप सुरू ठेवली. काही वेळात पुढच्या गाडयांचे स्टार्ट झाल्याचे आवाज ऐकू आले तसं तिनं डोकं मागं टेकवत झोपायचा निष्फळ प्रयत्न सुरू केला.

5 comments:

साधक said...

जिवंत वर्णन ! खूपच छान.

Alhad said...

हे एवढंच?
अजून लिवा की!

ओहित म्हणे said...

पुढं?

Monsieur K said...

aage kya huaa?

Unknown said...

Chan oghavate lihile ahes...pudhe?