26.3.07

क्रिकेट.. क्रिकेट?

दि. २३ मार्च: तुलसी-पार्वती-प्रेरणा त्रिकूटाने परत एकदा सुटकेचा नि:श्वास टाकला आहे, असे आम्हाला आमच्या खात्रीशीर सूत्रांकरवी समजते. १३ मार्चपासून या त्रयीने विश्वकरंडकामधून परतीसाठी दादरच्या सिध्दिविनायकाकडे साकडे घातल्याचे वृत्त आहे. आजच्या सामन्यानंतर परत एकदा दूरचित्रवाणीसंचाचा ताबा महिलावर्गाकडे जाण्याची शक्यता बळावली असून मंदिरा बेदी यानी याबद्दल असंतोष व्यक्त केला आहे.

'पुण्यानंद' च्या खास पत्रकार समूहाने केलेल्या संशोधनानुसार अतिशय विस्मयकारक माहिती उजेडात आली आहे. प्रा. बुध्दिसागर यांच्या मते क्रिकेटची पाळेमुळे भारताच्या इतिहासात असून त्यावर संशोधन होण्याची गरज आहे. त्यासंबंधी अधिक विचारणा केली असता त्यांनी आपल्या 'भारतीय इतिहास : महाभारतकालीन व रामायणातले संदर्भ' या प्रबंधाचा आधार दिला. वास्तविक पहाता रावणाच्या दहा तोंडामुळेच क्रिकेटमधील दहा खेळाडूंची संकल्पना अस्तित्वात आली असून शंभर कौरवांनी प्रथम विश्वकरंडकाला मूर्तरूप दिले आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच भाषातज्ञानीही याला दुजोरा दिला आहे. भाषातज्ञांच्या मते सध्याच्या काळातला 'out' हा शब्द म्हणजे 'औट' घटकेच्या खेळीवरून आला आहे. इतिहासकारांनी याला स्वातंत्र्यपूर्व कालीन संदर्भ देत चंपानेर नामक खेड्यातला क्रिकेटचा प्रसार आणि भुवन नामक शेतकरी याचे योगदान यावर टिपणी केली. सध्याच्या काळातले क्रिकेट म्हणजे भारतीयांनी केलेले पाश्चात्त्यांचे अनुकरण यावर तज्ञांचे एकमत झाले.


यावर्षीच्या दहावीतल्या पाल्यांच्या पालकांनी केलेल्या मागणीला मान देत भारतीय संघाने आपले आव्हान प्रथम फेरीत समाप्त करण्याचा निर्णय घेतला, असे आमचा बातमीदार कळवतो. भारतीयानी क्रिकेटसाठी आपला अमूल्य वेळ घालवावा, हे अत्यंत व्यथित करणारे आहे असे भारतीय कप्तान राहुल द्रविड यांनी नमूद केले आणि भारताच्या सर्वांगीण प्रगतीला हातभार म्हणून आपण हे पाऊल उचलल्याचे स्पष्ट केले.


भारतीयांच्या कार्यशीलतेला अधिकाधिक वाढवण्यासाठीचा हा निर्णय अत्यंत स्पृहणीय आहे, असे राष्ट्राध्यक्षांनी सांगून भारतीय संघाला धन्यवाद दिले आहेत. या धन्यवादांचे श्रेय कुणाचे यावर फलंदाज आणि गोलंदाज यात मतभेद असे कळते. आमच्या दैनिकाने आज संध्याकाळी 'क्रिकेटः भारताचा उदयास्त' यावर एक परिचर्चा आयोजित केली असून श्रोत्यानी त्याचा अवश्य लाभ घ्यावा. ( प्रवेश शुल्क : रू. १० श्रोत्यानी फुकट प्रवेशपत्रासाठी कृपया गळ घालू नये, ही विनंती.)

10 comments:

Rohit said...

LOL ... that was awesome. the origin of "out" was hillarious! tumachya kade reporter mhaNun malapaN gheNar kay?

HAREKRISHNAJI said...

तुह्माला हे कसे काय सुचते बुवा ? मान गये उस्ताद.

Anonymous said...

हा लेखही छानच जमला आहे. खास करून पहीले दोन परिच्छेद.
"सध्याच्या काळातले क्रिकेट म्हणजे भारतीयांनी केलेले पाश्चात्त्यांचे अनुकरण यावर तज्ञांचे एकमत झाले." हे बाकी खरे, आमच्या काळी असे नव्हते :)

madhavi said...

Khallaaasssssss!

kouravanni world cup la amurte roop dile - was JUST GREAT!

स्नेहा said...

रोहित : कधी येतो आहेस? पत्रकाराची जागा रिकामी आहे! :)

अनामिकः आमच्या काळीही असे नव्हते!!

माधवी: धन्यवाद म्हणू काय?

हरेकृष्णजी: ताजमहाल चहाचा परिणाम असावा!

Bhagyashree said...

हाहा... फारच सही झालाय लेख! खूपच छान!
btw, thanks for commenting on my blog.. आणि अग, त्या पुस्तकाचे नाव, 'मी चार्ली चॅपलीन' असेच आहे... फक्त अनुवादकाचे नाव नाही कळले..

Samved said...

शेवटची टीप फार आवडली..ditto पुणेरी. कुठल्याश्या blog वर सध्या कबड्डी हाच आपल्याला कसा योग्य खेळ आहे याची छान चर्चा सुरु आहे

HAREKRISHNAJI said...
This comment has been removed by the author.
सहज said...

mastt jamun aala aahe.

Dhanashri K said...

Wah Sneha! Apratim lihites.. khaas marathi shailitla (agadi Puneri!) marathit lihilela blog vaachun dhanya vattay! Ashich lihit raha :)