26.3.07

क्रिकेट.. क्रिकेट?

दि. २३ मार्च: तुलसी-पार्वती-प्रेरणा त्रिकूटाने परत एकदा सुटकेचा नि:श्वास टाकला आहे, असे आम्हाला आमच्या खात्रीशीर सूत्रांकरवी समजते. १३ मार्चपासून या त्रयीने विश्वकरंडकामधून परतीसाठी दादरच्या सिध्दिविनायकाकडे साकडे घातल्याचे वृत्त आहे. आजच्या सामन्यानंतर परत एकदा दूरचित्रवाणीसंचाचा ताबा महिलावर्गाकडे जाण्याची शक्यता बळावली असून मंदिरा बेदी यानी याबद्दल असंतोष व्यक्त केला आहे.

'पुण्यानंद' च्या खास पत्रकार समूहाने केलेल्या संशोधनानुसार अतिशय विस्मयकारक माहिती उजेडात आली आहे. प्रा. बुध्दिसागर यांच्या मते क्रिकेटची पाळेमुळे भारताच्या इतिहासात असून त्यावर संशोधन होण्याची गरज आहे. त्यासंबंधी अधिक विचारणा केली असता त्यांनी आपल्या 'भारतीय इतिहास : महाभारतकालीन व रामायणातले संदर्भ' या प्रबंधाचा आधार दिला. वास्तविक पहाता रावणाच्या दहा तोंडामुळेच क्रिकेटमधील दहा खेळाडूंची संकल्पना अस्तित्वात आली असून शंभर कौरवांनी प्रथम विश्वकरंडकाला मूर्तरूप दिले आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच भाषातज्ञानीही याला दुजोरा दिला आहे. भाषातज्ञांच्या मते सध्याच्या काळातला 'out' हा शब्द म्हणजे 'औट' घटकेच्या खेळीवरून आला आहे. इतिहासकारांनी याला स्वातंत्र्यपूर्व कालीन संदर्भ देत चंपानेर नामक खेड्यातला क्रिकेटचा प्रसार आणि भुवन नामक शेतकरी याचे योगदान यावर टिपणी केली. सध्याच्या काळातले क्रिकेट म्हणजे भारतीयांनी केलेले पाश्चात्त्यांचे अनुकरण यावर तज्ञांचे एकमत झाले.


यावर्षीच्या दहावीतल्या पाल्यांच्या पालकांनी केलेल्या मागणीला मान देत भारतीय संघाने आपले आव्हान प्रथम फेरीत समाप्त करण्याचा निर्णय घेतला, असे आमचा बातमीदार कळवतो. भारतीयानी क्रिकेटसाठी आपला अमूल्य वेळ घालवावा, हे अत्यंत व्यथित करणारे आहे असे भारतीय कप्तान राहुल द्रविड यांनी नमूद केले आणि भारताच्या सर्वांगीण प्रगतीला हातभार म्हणून आपण हे पाऊल उचलल्याचे स्पष्ट केले.


भारतीयांच्या कार्यशीलतेला अधिकाधिक वाढवण्यासाठीचा हा निर्णय अत्यंत स्पृहणीय आहे, असे राष्ट्राध्यक्षांनी सांगून भारतीय संघाला धन्यवाद दिले आहेत. या धन्यवादांचे श्रेय कुणाचे यावर फलंदाज आणि गोलंदाज यात मतभेद असे कळते. आमच्या दैनिकाने आज संध्याकाळी 'क्रिकेटः भारताचा उदयास्त' यावर एक परिचर्चा आयोजित केली असून श्रोत्यानी त्याचा अवश्य लाभ घ्यावा. ( प्रवेश शुल्क : रू. १० श्रोत्यानी फुकट प्रवेशपत्रासाठी कृपया गळ घालू नये, ही विनंती.)

22.3.07

भारत : २०२० साली एक चिंतन

सध्या सर्वत्र 'भारताची २०२० साली होणारी संभाव्य भरभराट' आणि त्या संदर्भाने त्या वेळच्या पिढीची सुबत्ता यावर व्याख्यानमाला झडत आहेत. (नुकताच चितळेनी 'बाकरवडी: २०२० साली' असा एक परिसंवाद आयोजित केला होता. जिज्ञासूनी अधिक माहितीसाठी प्रत्यक्ष संपर्क साधावा. वेळः संध्या. ४ ते ४.३०. वि. सू. आमचा इतरत्र कुठेही ब्लॉग नाही.)
तर या पिढीच्या आरोग्याविषयी जागतिक परिषद पुण्यात भरली होती (स्थळः बापट वाडा,सोमवार पेठ) ज्याला उपस्थित रहायचे भाग्य मला लाभले. परिषदेचा एकंदर सूर असा होता की २०२० साली ह्र्दयविकार हा प्रमुख आजार असेल आणि नैसर्गिक जीवनशैली हाच यावर उपाय होऊ शकेल. या नैसर्गिक जीवनशैलीत चालणे या व्यायामप्रकारावर भर देण्यावर एकमत(!!) झाले. यासाठी सध्याच्या परिस्थितीत आपण जितके इंधनाचे स्रोत आहेत ते लवकरात लवकर संपवून भावी पिढ्याना चालणे आणि दुचाक्या यांचे प्रशिक्षण दयायला हवे.
विचार करा, २०२० साली एक शेजारीण दुसरीला म्हणते आहे," अगं, आमच्या सॅमने नवीन फेरारी दुचाकी घेतली बरं.." यावर ती नाक मुरडून म्हणते," दुचाकी!! कुठल्या जगात वावरते आहेस तू! आमचा मॅक तर ताशी १० किमीच्या गतीने चालत जातो!" मग लोक कोथरुडहुन तुळशीबागेत जायला गुगल मॅप्स् वापरतील. 'पुण्याच्या खड्ड्यातून भरधाव दुचाक्या कशा चालवाव्या' याचे प्रशिक्षण वर्ग निघतील(चालाल तर हसाल, न चालाल तर फसाल! अशा जाहिरातीसह). चालताना घ्यावयाची काळजी यावर वसंत व्याख्यानमाला रंगतील आणि 'दुचाकीवर अधिभार लावावा का' या विषयावर म. न. पा. मध्ये गदारोळ उडेल. Tour De India आयोजित केली जाईल आणि विजेत्याना पुणे- मुंबई प्रवासाइतके इंधन बक्षिस म्हणुन देण्यात येईल.
नुसत्या अशा कल्पनानी हुरळून जाऊ नका वाचकहो! या प्रगतीसाठी आपले सहकार्य अपेक्षित आहे. आज या क्षणापासून सर्वत्र गाडी वापरायचा असा निश्चय करा. कितीही जवळ असो, गाडीला अंतर न देता अंतर पार करा. ए, कोण तो प्रदूषण वगैरे बडबडतोय, तिकडे लक्ष नका देऊ, अहो, आता थोडाफार त्रास तर घ्यावा लागणारच ना रम्य भावीकालासाठी!!

18.3.07

नवी विटी, नवं राज्य!

अस्मादिकांच्या 'ब्लॉग लिहिण्याचा' प्रस्ताव अखिल मित्रसंप्रदायात इतकी खळबळ माजवेल याची यत्किंचीतही कल्पना नव्हती मला! मी ब्लॉग लिहिणार हे कळताच प्रतिकियांचा पाऊस सुरु झाला.
१. "ब्लॉग.. हम्म्.. कशाशी खातात हे तरी माहित आहे का तुला?"
२. "वेळ घालवायला काहीतरी हवं की तुला.. पण नुसतेच कळफलकावर आपटाआपटी करू नकोस.."
३. "आणखिन एक ब्लॉग झेलायला तयार रहा रे!!.."
४. "फक्त आम्हालाच का तुला सहन करावं लागावं, कर सुरुवात.."
५. " तू लिहित रहा, फळाची म्हणजे कुणी वाचेल अशी अपेक्षा नको करू. 'लेखकु उदंड जाहला' अशा युगात 'वाचकु' लाभेल न लाभेल तरी आपण लेखनप्रपंच सुरु ठेवावा हेच बरं, नाही का?"
छिद्रान्वेषीनी माझ्या लेखनप्रतिभेला अडसर घातला तरी थांबून रहाणारी मी थोडीच आहे!! :-) आपल्या इतक्या अनुभवांचा साठा जगापुढे मांडला नाही तर जग एका मोठया प्रतिभावंताला मुकेल का काय, असे वाटून मी लगेच लेखणी हाती धरली. 'येथे पाहिजे जातीचे' हे त्या वंशाला गेल्याशिवाय कळणार कसे म्हणा!!
त्यामुळे 'एकला चलो रे' च्या धर्तीवर मनाच्या गुंत्यात गुंफलेला हा शेला विणायला तरी घेतला आहे. शेवटी केल्विनच्या शब्दात सांगायच तर, 'It's magical world, Hobbes, ol' buddy.. let's go exploring!'